
भारतात जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेस सुरवात झाली आहे.
नवी दिल्ली : भारतात जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेस सुरवात झाली आहे. या मोहिमेचा आज चौथा दिवस. गेल्या तीन दिवसांपासून 3.8 लाख लोकांना कोरोनाची लस दिली गेली आहे. लसीकरणानंतर 580 जणांना त्याचे साईड इफेक्ट्स जाणवल्याची प्रकरणे समोर आली आहेत. यापैकी सात लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे. तर दोन लोकांचा मृत्यू झाला आहे, मात्र या मृत्यूंचा लसीकरणाशी काहीही संबंध नसल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये सोमवारी संध्याकाळी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. सरकारी हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयला (46)मृत्यूआधी 24 तासांपूर्वी लस दिली गेली होती. अधिकाऱ्यांनी सांगितलं की महिपाल यांचा मृत्यू लसीकरणाशी संबंधित नाहीये. राज्य सरकारने म्हटलं की, पोस्टमार्टममध्ये मृत्यूचे कारण कार्डीओ-पल्मोनरी डिसीज सांगितलं गेलं आहे. महिपालच्या परिवाराने सांगितल्यानुसार, कोरोना लस दिली जाण्याआधी त्यांची तब्येत खराब होती. तर कर्नाटकमधील बेल्लारी गावात दुसरा मृत्यू झाला आहे. अद्याप या मृताचा पोस्टमार्टम रिपोर्ट येणे बाकी आहे. कर्नाटकचे आरोग्य मंत्री यांनी सांगितलं आहे की, हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. हा मृत डायबेटीजचा रुग्ण होता.
हेही वाचा - corona update: समाधानकारक; जूननंतर पहिल्यांदाच 24 तासात 10 हजार कोरोना रुग्ण
सरकारने आपल्या वक्तव्यात सांगितलं आहे की, 16 जानेवारी रोजी लसीकरम सुरु झाल्यानंतर साईड इफेक्ट्सची 580 प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीमध्ये तीन लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यातील दोघांना डिस्चार्ज दिला गेला आहे.
गेल्या 24 तासात देशात 10,064 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे. अनेक महिन्यांनतर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 10 हजारापर्यंत कमी झाला आहे. मागील 24 तासात 17,411 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 137 लोकांना आपला जीव ममवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली आहे.