कोलकता महापालिका निवडणूकीत तृणमूलचा दणक्यात विजय; भाजपचा अक्षरश: धुव्वा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee

कोलकता महापालिका निवडणूकीत तृणमूलचा दणक्यात विजय; भाजपचा अक्षरश: धुव्वा

कोलकता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत (Pashchim Bengal Assembly Election) सात महिन्यांपूर्वी दणदणीत विजय मिळविल्यावर कोलकता महापालिका निवडणुकीतही (Kolkata Municipal Corporation election) तृणमूल काँग्रेसनेही दिमाखदार विजय मिळविला. महापालिकेत तृणमूलने (TMC) सत्तेची हॅटट्रिक साधली. एकूण १४४ वॉर्डपैकी १३४ वॉर्डमध्ये पक्षाने विजय मिळविला आहे. या निवडणुकीत भाजपला अवघ्या तीनच जागा मिळाल्या. डावे पक्ष व काँग्रेसने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. अपक्ष तीन वॉर्डमध्ये विजयी झाले आहेत.

हेही वाचा: गाय पवित्र असल्यानं तिची खिल्ली उडविण्याचं धाडस कोणी करू शकत नाही - HC

कोलकता महापालिकेच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळविले. जागांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावरील भाजपपेक्षा तृणमूल काँग्रेस खूप पुढे आहे. मात्र, मतांच्या बाबतीत बहुतेक वॉर्डात डाव्या आघाडीचा प्रमुख विरोधक म्हणून उदय झाला आहे. डावे ६५ वॉर्डमध्ये तर भाजप ४८ वॉर्डमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. विधानसभा निवडणुकीत कोलकत्यातील सर्व १६ मतदारसंघात तृणमूलने विजय मिळविला होता. तर, मतांच्या टक्केवारीनुसार भाजप तृणमूलचा प्रमुख प्रतिस्पर्धी होता. दरम्यान, महापालिकेत तृणमूलला प्रचंड मतांनी विजयी केल्याबद्दल पक्षाच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. भाजपने मात्र तृणमूलचे दहशतीच्या राजवटीचे प्रतिबिंब उमटल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: लहान मुलांना सध्या लसीची गरज नाही; NTAGI ची केंद्राला माहिती

निवडणूक निकाल

  • तृणमूल काँग्रेस - १३४

  • भाजप - ३

  • काँग्रेस - २

  • डावे पक्ष - २

  • अपक्ष - ३

एकूण जागा - १४४

या विजयाबाबत बोलताना तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हटलंय की, कोलकता महापालिकेतील हा विजय मी पश्चिम बंगालमधील जनता आणि माँ, माती, मानुष (माता, भूमाता आणि लोक) यांना समर्पित करते. भाजप, काँग्रेस व माकपसारखे अनेक राष्ट्रीय पक्ष आमच्याविरुद्ध लढले. हा विजय आगामी काळात राष्ट्रीय राजकारणाचा मार्ग दाखवेल.

टॅग्स :Mamata BanerjeeTMC