माणुसकीला काळीमा; तो जळत होता अन् लोक व्हिडिओ काढत होते...

वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

माणुसकीला काळीमा फासणारी एक दुर्दैवी घटना कोटा येथे घडली आहे. एका 53 वर्षाच्या उद्योगपतीच्या गाडीला आग लागली. आग लागल्यानंतर तो गाडीतच अडकून राहिला. गाडीत अडकल्यानंतर लोकांनी त्याला वाचवायचं सोडून लोक त्याचा व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते.

कोटा : माणुसकीला काळीमा फासणारी एक दुर्दैवी घटना कोटा येथे घडली आहे. एका 53 वर्षाच्या उद्योगपतीच्या गाडीला आग लागली. आग लागल्यानंतर तो गाडीतच अडकून राहिला. गाडीत अडकल्यानंतर लोकांनी त्याला वाचवायचं सोडून लोक त्याचा व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते. तो मदतीसाठी विनंती करत होता. परंतु, त्याला कोणी वाचवले नाही, आणि त्याचा यातच जीव गेला.

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून कोटा-उदयपूर महामार्गावर ही घटना घडली आहे. बोरेखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा भाग येतो. आगीच्या ज्वालांनी या माणसाला अक्षरश: पूर्णपणे भाजून घेतले. तो जीवाच्या आकांताने ओरडत होता. पण कोणीही मदत केली नाही. संपूर्ण जळालेल्या अवस्थेतील या उद्योगपतीची नंतर त्याच्या गाडीच्या नंबर प्लेटवरून ओळख पटली. प्रेमचंद जैन असे त्यांचे नाव आहे. कोटा शहरातील कुन्हारी भागात ते राहत होते. जैन त्यांच्या अनंतपुरा येथील कारखान्याकडे बुधवारी गाडीने जात होते. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास त्यांची गाडीला बिघाड झाला आणि त्यांनी गाडी रिस्टार्ट केली आणि काही मीटर अंतरावर जाताच लोकांना गाडीतून धूर येत असल्याचे दिसले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गाडीचं सेंट्रल लॉक सुरू असल्याने जैन यांना बाहेर येता आले नाही. गाडीने पेट घेतला आणि जैन यांच्या देहाचा अक्षरश: कोळसा झाला आणि सांगाडा तेवढा शिल्लक राहिला. जेव्हा गाडीने पेट घेतला त्यावेळी लोकांनी गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न केला असता तर प्रेमचंद यांचा जीव वाचला असता असे पोलिसांनी सांगितले. शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kota man burnt alive in car as onlookers film tragedy