कुलभूषण प्रकरणी हस्तक्षेप करणार नसल्याचे 'युएन'चे संकेत

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

कुलभूषण जाधवप्रकरणी हस्तक्षेप करणार नसल्याचे संकेत संयुक्त राष्ट्र संघाने (युएन) दिले आहेत. "या प्रकरणी आम्ही सध्या कायदेशीर वैधतेबाबत निर्णय देण्याच्या स्थितीत नाहीत', असे युएनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

नवी दिल्ली - भारतीय नागरिक असलेल्या कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. या प्रकरणी हस्तक्षेप करणार नसल्याचे संकेत संयुक्त राष्ट्र संघाने (युएन) दिले आहेत. 'या प्रकरणी आम्ही सध्या कायदेशीर वैधतेबाबत निर्णय देण्याच्या स्थितीत नाहीत', असे युएनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

युएनचे सरचिटणीस अंतोनियो गुटरेस यांचे प्रवक्ते स्टिफन ड्युजरिक यांनी याबाबत हस्तक्षेप करण्यात येणार नसल्याचे संकेत दिले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ड्युजरिक यांना विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी दोन्ही देशांनी शांततापूर्ण चर्चेने प्रश्‍न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करतो असे सांगितले. मात्र, कुलभूषण प्रकरणाच्या कायदेशीर वैधतेवर निर्णय देण्याच्या स्थितीत नसल्याचे म्हणत हस्तक्षेप करता येणार नसल्याचे संकेत दिले आहेत.

बलुचिस्तानमधील नेत्यांनीही कुलभूषण यांना फाशी देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचा निषेध केला आहे. ही फाशीची शिक्षा अमानुष आणि बेकायदेशीर असल्याचे मत बलुच रिपब्लिकन पार्टीचे नेते अशरफ शेरजान यांनी वृत्तसंस्तेशी बोलताना सांगितले. कुलभूषण यांचे प्राण वाचविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्‍य ती सर्व मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. जाधव यांची पाकिस्तानकडून पूर्वनियोजित हत्या होत असल्याचे भारताने म्हटले आहे.

Web Title: Kulbhushan Jadhav death sentence: United Nations says not in position to judge legality of Pakistani process