esakal | कुलभूषण जाधव यांना पाकने "पढविले' 
sakal

बोलून बातमी शोधा

Kulbhushan Jadhav pressurized by Pakistan

जाधव यांच्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयात कैदेतील परकी सेनाधिकाऱ्यांना द्यावयाच्या संपर्क-संधीविषयक (कॉन्सुलर ऍक्‍सेस) जीनिव्हा कराराचा पाकिस्तानकडून अतिशय मोठ्या प्रमाणात भंग झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

कुलभूषण जाधव यांना पाकने "पढविले' 

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या कैदेत असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची इस्लामाबादमधील भारतीय उपउच्चायुक्तांनी आज भेट घेतली. या भेटीच्या वेळी जाधव अत्यंत दबावाखाली असल्याचे आणि त्यांना जे "पढविण्यात' आले, तेवढेच बोलले, असा प्राथमिक अहवाल उपउच्चायुक्तांनी सादर केला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशावरून पाकिस्तानने जाधव यांच्याबरोबरच्या संपर्काची ही संधी उपलब्ध केली. 

जाधव यांच्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयात कैदेतील परकी सेनाधिकाऱ्यांना द्यावयाच्या संपर्क-संधीविषयक (कॉन्सुलर ऍक्‍सेस) जीनिव्हा कराराचा पाकिस्तानकडून अतिशय मोठ्या प्रमाणात भंग झाल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानने तत्काळ हा संपर्क उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. सुरवातीला पाकिस्तानने ही संधी दिली; मात्र त्यावेळच्या बंधनांमुळे भारताने ती फेटाळली होती. न्यायालयाच्या निर्णयानुसारच कोणाही पाकिस्तानी अधिकाऱ्यांची उपस्थिती नसताना मुक्त अशी ही संपर्काची संधी असली पाहिजे, असा आग्रह धरून भारताने हा पहिला प्रस्ताव नाकारला होता. 

त्यानंतर पाकिस्तानने आज ही संधी पुन्हा देण्याचे मान्य केले. त्यानुसार भारतीय उपउच्चायुक्त जाधव यांना सुमारे अडीच तासांच्या अवधीसाठी भेटले. या भेटीत जाधव त्यांना अतिशय मोठ्या दबावाखाली व तणावग्रस्त आढळून आले आणि केवळ पाकिस्तानची प्रशंसा करणाऱ्या गोष्टी पढविल्याप्रमाणे ते बोलल्याचे उपउच्चायुक्तांनी सांगितले. यासंदर्भातील तपशीलवार अहवाल आपण लवकरच तयार करू आणि त्यामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे कितपत पालन झाले आहे, याची माहितीही देण्यात येईल. त्या आधारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे जारी निवेदनात म्हटले आहे. 

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दूरध्वनीवरून जाधव यांच्या मातुःश्रींबरोबर संपर्क साधून त्यांना आजच्या भेटीचे तपशील सांगितले. जाधव यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी, यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाहीही केंद्र सरकारने यानिमित्ताने दिली आहे. 

आदेशानंतरच भेट 
पाकिस्तानने जाधव यांना बलुचिस्तानात पकडल्याचा दावा केला आहे आणि त्यासंदर्भात पाकिस्तानी लष्करी न्यायालयापुढे जाधव यांना सादर करून त्यांना फाशीची सजा सुनावली होती. त्यानंतर भारत सरकारने आंतरराष्ट्रीय न्यायालयात अर्ज करून याप्रकरणी दाद मागितली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्त कार्यालयास जाधव यांच्याशी संपर्काची संधी दिली पाहिजे, असा आदेश दिला होता. त्या आदेशानुसारच आजची बैठक झाली होती.  

loading image
go to top