कॉंग्रेसच्या मेहेरबानीमुळे मी मुख्यमंत्री : कुमारस्वामी 

यूएनआय
मंगळवार, 29 मे 2018

खातेवाटपावरून दिल्लीत खलबते; आपण कॉंग्रेसच्या शब्दाबाहेर नाही.

नवी दिल्ली - आपण कॉंग्रेस पक्षाच्या मेहेरबानीवर मुख्यमंत्री झालो असून, त्यांच्या परवानगीशिवाय आपण काहीच करणार नाही, अशी स्पष्टोक्ती कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केली. कर्नाटकमध्ये जेडीएस- कॉंग्रेस आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळासाठी मोर्चेबांधणी सुरू असताना मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी दिल्लीत असून, ते पत्रकारांशी बोलत होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री कुमारस्वामी दिल्लीत आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर बोलताना ते म्हणाले, की मी कॉंग्रेसच्या दयेवर मुख्यमंत्री झालो असलो, तरी राज्याच्या विकासासाठी संपूर्णपणे जबाबदार आहे. मुख्यमंत्री या नात्याने मी काम करण्यास बांधील आहे. कॉंग्रेसची परवानगी घेऊनच मी काम करत आहे. आपण त्यांच्या शब्दाबाहेर नाही. त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान आणि अन्य मंत्र्यांची भेट घेणे हे माझे कर्तव्य आहे आणि त्यासाठीच दिल्लीत आलो असल्याचे कुमारस्वामी म्हणाले. राज्यातील साडेसहा कोटी जनतेमुळे नाही, तर कॉंग्रेसच्या मेहेरबानीवर मी मुख्यमंत्री झालो आहे. जनतेने आपल्याला बहुमत देऊन विधानसभेत पोचवलेले नाही. तरीही एका आठवड्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही तर राजीनामा देऊ, असे कुमारस्वामी म्हणाले. 

मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा 

कर्नाटकच्या कॅबिनेटवरून दिल्लीत कॉंग्रेस आणि जेडीएसच्या नेत्यांत चर्चा झाली. कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री कुमारस्वामी, एच. डी. रेवन्ना, अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे आदी नेते उपस्थित होते. कॉंग्रेसमवेतची चर्चा सकारात्मक झाल्याचे कुमारस्वामी यांनी म्हटले आहे. आपण सर्वकाही कॉंग्रेसवर सोडले आहे. कॉंग्रेस हा मोठा पक्ष आहे, आमचा पक्ष लहान आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेसला प्रमुख खाती हवी असून, त्यात अर्थ, गृह, ऊर्जा, सिंचन आणि ग्रामीण विकास यांचा समावेश आहे. दोन्ही पक्षांतील चर्चेचे घोडे अर्थमंत्रालयावरून अडले आहे. जेडीएसच्या मते, अर्थमंत्रालय मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याकडे राहावे. याशिवाय आणखी काही प्रमुख विभागांचीही मागणी केली जात आहे. 
 

Web Title: kumaraswamy says i am at mercy of congress