कर्नाटकात कुमार'स्वामी'; बुधवारी शपथविधी 

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

सोनिया-देवेगौडांची आज भेट 
सोनिया गांधी व "जेडीएस'चे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची उद्या (रविवारी) भेट होणार आहे. देवेगौडा स्वतः दिल्लीत जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मोदींविरोधी सर्व नेत्यांना शपथविधी समारंभाला हजर राहण्याची विनंती ते करणार आहेत. 

बंगळूर : येडियुराप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) व कॉंग्रेस युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आज सायंकाळी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी या युतीचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांना सत्ता स्थापन करण्यास पाचारण केले आहे. ते बुधवारी (ता. 23) कंठीरवा स्टेडियमवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्यासोबत किती जण शपथ घेतील, हे लवकरच ठरेल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कॉंग्रेसला 21 व "जेडीएस'ला 13 मंत्रिपदे मिळण्याची शक्‍यता आहे. 

राज्यपालांनी कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिला आहे. परंतु, एवढा कालावधी आपल्याला लागणार नसल्याचे कुमारस्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

कुमारस्वामी म्हणाले, "देशातील इतर राज्यांमधील भाजपविरोधी सर्व पक्षांना निमंत्रण देण्याचे नियोजन आहे. पश्‍चिम बंगालमधून ममता बॅनर्जी, बसपच्या मायावती, चंद्रबाबू नायडू यांच्यासह अनेक नेत्यांचे आम्हाला मार्गदर्शन लाभले असून, त्यांना शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्यासाठी दोन्ही पक्षांकडून बोलावणार आहोत.'' आमचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 
दरम्यान, रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षांची वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बैठक सुरू होती. मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा, याबाबत दोन्ही पक्षांमध्ये आता खल सुरू आहे. 

सोनिया-देवेगौडांची आज भेट 
सोनिया गांधी व "जेडीएस'चे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची उद्या (रविवारी) भेट होणार आहे. देवेगौडा स्वतः दिल्लीत जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मोदींविरोधी सर्व नेत्यांना शपथविधी समारंभाला हजर राहण्याची विनंती ते करणार आहेत. 

कर्नाटक विश्‍वासदर्शक ठराव्याच्या दरम्यान कॉंग्रेसने जनता दल (यु) ला पाठिंबा देत समंजसपणा दाखवला असून, कॉंग्रेसच्या युवा नेतृत्वाने भाजप विरोधात घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. राज्यपालांची भूमिका उचित नव्हती. देशाच्या लोकशाहीचे संकेत न्यायालयाच्या आदेशाने पाळल्याचे समाधान आहे. 
- शरद पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष 

हा प्रादेशिक आघाडी आणि लोकशाहीचा विजय असून, अभिनंदन कर्नाटक, अभिनंदन देवेगौडाजी, कुमारस्वामीजी. कॉंग्रेस आणि इतरांचेही अभिनंदन. 
- ममता बॅनर्जी, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री 

लोकशाहीविरोधी वर्तनामुळे अखेर भाजपचा पराभव झाला असून, लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या सर्वांना याचा आनंद आहे. कर्नाटकमध्ये असलेल्या तेलगू नागरिकांनी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका अदा केली आहे. 
- चंद्राबाबू नायडू, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री 

जनतेचा कौल हा पैशाच्या ताकतीपेक्षा मोठा असतो, हे आज सिद्ध झाले. पैशाच्या बळावर सर्व काही खरेदी करू पाहणाऱ्यांना यातून चांगला धडा मिळाला आहे. पराभवाची जबाबदारी स्विकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला राजीनामा द्यावा. 
- अखिलेश यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष 

ऑपरेशन लोटस (कमळ) अयशस्वी झाले. अनुमानानुसार, बीएस येडियुरप्पा दोन दिवस राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्यांनी स्वतःचाच सात दिवस मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम मोडला. 
- रणदीप सुरजेवाला, कॉंग्रेस प्रवक्ते 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्नाटकामध्ये लोकशाही वाचली असून, आगामी निवडणुकांत धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येण्याची ही सुरवात आहे. कुमारस्वामी, कॉंग्रेसचे अभिनंदन. 
- एम. के. स्टॅलिन, 'डीएमके'चे कार्याध्यक्ष 

Web Title: Kumaraswamy to take oath on wednesday