नागा साधूंच्या शाही स्नानाने कुंभमेळा सुरू

पीटीआय
बुधवार, 16 जानेवारी 2019

प्रयागराज : मकर संक्रातीच्या पर्वावर विविध आखाड्यांतील नागा साधूंच्या शाही स्नानाबरोबरच मंगळवारपासून कुंभमेळ्यास प्रारंभ झाला. कडाक्‍याच्या थंडीत पहाटे पाच वाजून 45 मिनिटांनी श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि पंचायती अटल आखाडाचे नागा साधू संगमावर पोचले आणि शाही स्नानासाठी डुबकी मारली. 

प्रयागराज : मकर संक्रातीच्या पर्वावर विविध आखाड्यांतील नागा साधूंच्या शाही स्नानाबरोबरच मंगळवारपासून कुंभमेळ्यास प्रारंभ झाला. कडाक्‍याच्या थंडीत पहाटे पाच वाजून 45 मिनिटांनी श्री पंचायती आखाडा महानिर्वाणी आणि पंचायती अटल आखाडाचे नागा साधू संगमावर पोचले आणि शाही स्नानासाठी डुबकी मारली. 

अटल आखाडानंतर श्री पंचायती निरंजनी आखाडा आणि तपोनिधी श्री पंचायत आनंद आखाडाचे नागा साधूंनी शाही स्नान केले. निरंजनी आखाडात सोमवारी महामंडलेश्‍वर असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री निरंजन ज्योति यांनीही शाही स्नान केले. नागा साधूंचे शाही स्नान पाहण्यासाठी नागरिकांनी पहाटेपासूनच संगमावर गर्दी केली होती. या वेळी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवले आणि नागा साधू, संतांना संगमापर्यंत वाट काढून दिली.

आनंद आखाडाच्या शाही स्नानानंतर नागा साधूंचा सर्वांत मोठा आखाडा श्री पंच दशनाम जूना आखाडा, श्री पंच दशनाम आवाहन आखाडा आणि श्री शंभू पंच अग्नी आखाडाचे साधू, संतांनी शाही स्नान केले. जुना आखाडात शेकडो नागा साधू आणि संतांचा समावेश आहे. त्यानंतर निर्वानी आखाडा, दिगंबर आखाडा, निर्मोही आखाडा, बडा उदासीन आखाडा, नया उदासीन आखाडा आणि शेवटी निर्मल आखाडातील साधूंनी स्नान केले. 
शाही स्नानासाठी अर्धा तास वेळ शाही स्नानासाठी सर्व आखाडांना अर्धा ते पाऊण तासाचा वेळ देण्यात आला होता.

सकाळी तापमान दहा अंशांखाली असतानाही मोठ्या संख्येने नागरिक, साधू हे गंगा नदीत आणि संगमात स्नान करण्यासाठी आले होते. त्यात ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. सकाळी 11 वाजेपर्यंत सुमारे 67 लाख लोकांनी स्नान केल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. दिवसभर ऊन असल्याने या पवित्र संगमात स्नान करणाऱ्यांची संख्या सायंकाळपर्यंत एक कोटीपर्यंत पोचल्याची शक्‍यता वर्तविली गेली आहे. 

स्मृती इराणी यांचे शाही स्नान

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी संगम किनाऱ्यावर आज सकाळी शाही स्नान केले. त्यांनी गंगा स्नानाचे फोटो शेअर करत आपल्या ट्विटर अकाउंटवर "हर हर गंगे' असे म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोट्यवधी नागरिकांना कुंभमेळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: Kumbh Mela started with Naga sadhus Shahi Bath