शशी थरूर म्हणतात, 'हा उमेदवार काँग्रेस अध्यक्षपदासाठी सर्वोत्तम'

वृत्तसंस्था
रविवार, 28 जुलै 2019

- अध्यक्षांबाबत स्पष्टता नसल्याने नुकसान 
- थरूर यांचा कॉंग्रेसला घरचा आहेर
- महत्त्वाच्या पदांसाठी निवडणूक घेण्याचा सल्ला 

नवी दिल्ली ः राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे आणि पुढचा अध्यक्ष कोण, या संदर्भात कोणतीच स्पष्टता नसल्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे, असा घरचा आहेर पक्षाचे नेते आणि खासदार शशी थरूर यांनी दिला. पक्षाने कार्यकारिणीतील सदस्यांसह इतर सर्वच महत्त्वाच्या जागांसाठी निवडणूक घ्यावी, जेणेकरून नवे नेतृत्त्व पुढे येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसने तरुण नेत्याकडे पक्षाचे नेतृत्त्व द्यावे, असे म्हटले होते. त्याला शशी थरूर यांनी समर्थन दिले. तरुण नेत्याला नेतृत्त्व करण्याची संधी दिल्यास ते जास्त स्वागतार्ह आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

अध्यक्षपदी कोण असणार, याबाबत स्पष्टता नसल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक गोंधळलेले आहेत. त्यांच्या भावनांना धक्का बसू लागलाय. पक्षाचे निर्णय घेण्यासाठी, कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी, त्यांना प्रेरित करण्यासाठी अध्यक्षांची गरज आहे; पण त्याबाबतच स्पष्टता नसल्याने कार्यकर्ते अधिक चिंतित आहेत. 

तात्पुरता उपाय म्हणून पक्षाने एखाद्या नेत्याकडे अंतरिम अध्यक्ष म्हणून कार्यभार द्यावा. त्यानंतर हा विषय पूर्णपणे सोडवावा. त्यासाठी गरज पडली तर पक्षांतर्गत निवडणूक घेतली जावी, असेही थरूर यांनी सुचविले आहे. 

प्रियांका सर्वोत्तम उमेदवार 
कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींमध्ये करिश्‍मा आहे. त्या कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या सर्वोत्तम उमेदवार ठरतील, असे मत शशी थरूर यांनी व्यक्त केले आहे. पक्षाकडून जेव्हा अधिकृतपणे पुढील अध्यक्षपदासाठी निवडणूक घेतली जाईल. त्या वेळी प्रियांका गांधी यांनीही या पदासाठी पुढे यावे, अशी इच्छा शशी थरूर यांनी व्यक्त केली; पण हा निर्णय सर्वस्वी गांधी कुटुंबाने घ्यावा, असेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of clarity at top hurting Cong; polls to key posts