esakal | New Delhi : लडाखमध्ये चीनची कुमक
sakal

बोलून बातमी शोधा

delhi

New Delhi : लडाखमध्ये चीनची कुमक

sakal_logo
By
तेजस भागवत

नवी दिल्ली : चीनने लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केला असून ही आपल्यासाठी चिंतेची बाब असल्याचे लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे.

लडाखमधील लष्करी माघारीच्या मुद्यावरून लवकरच उभय देशांतील तेरावी चर्चा पार पडणार असून त्या पार्श्वभूमीवर नरवणे यांनी केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. चीनने पूर्व आणि उत्तर लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर फौजफाटा तैनात केला आहे. येथील चिनी सैनिकांच्या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने ही आपल्यासाठी चिंतेची बाब असल्याचे नरवणे यांनी एएनआयशी बोलताना सांगितले. जी माहिती आमच्या हाती येते आहे त्याआधारे आम्ही सीमेवरील हालचालींकडे बारीक लक्ष ठेवून आहोत.

संभाव्य धोक्याचा विचार करूनच येथे पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच जवानांच्या संख्येमध्ये वाढ केली जाते आहे. सद्यस्थितीमध्ये आम्ही कोणत्याही आव्हानाला सामोरे जायला तयार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्व लडाखमधील तयारीचा आढावा घेण्यासाठी जनरल नरवणे दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी रेझांग ला युद्ध स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. हे स्मारक रेझांग ला आणि रेचिन ला या दोन ठिकाणांना लागून असून फेब्रुवारी महिन्यामध्ये भारत आणि चीनच्या लष्कराने याच भागातून माघार घेतली होती. दोन्ही देशांच्या लष्कराने गोगरा पोस्टपासून माघार घेतली असलीतरीसुद्धा हॉट स्प्रिंग येथे मात्र दोन्ही देशांचे लष्कर आमनेसामने आले आहे.

भारताकडून हॉवित्झर तोफा तैनात

भारताने खबरदारीचा उपाय म्हणून लडाख सीमेवर ‘के-९ वज्र हॉवित्झर’ तोफा तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून ५० किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा थेट वेध घेता येऊ शकतो. लडाखमध्ये भारताने ‘टी-९०’ रणगाडेही तैनात केले आहेत. याबाबत बोलताना लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे म्हणाले की, उंचावरील ठिकाणावर देखील या तोफा तैनात केल्या जाऊ शकतात. या तोफांच्या चाचण्या याआधीही प्रचंड यशस्वी झालेल्या आहेत. त्यामुळेच आम्ही पूर्ण रेजिमेंटच सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला होता.’’ संरक्षण मंत्रालयाने शंभर के-९ वज्र तोफांची ऑर्डर दिली होती त्यातील ५१ तोफा मिळाल्या आहेत. भविष्यामध्ये या तोफांची संख्या आणखी वाढू शकते.

loading image
go to top