esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

 टिकैत

लखीमपूरमध्ये कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. तरीही राकेश टिकैत हे मात्र गाझीपूरहून लखीमपूरला पोहोचले.

लखीमपूरचा विषय संपला, शेतकरी आणि प्रशासनाच्या चर्चेतून तोडगा - टिकैत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये रविवारी आंदोलक शेतकऱ्यांना गाडीने चिरडल्याच्या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशात राजकीय वातावरण तापलं आहे. यानंतर काँग्रेससह इतर पक्षाच्या नेत्यांनी योगी सरकारसह केंद्र सरकारवर हल्लाबोल करत कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी लखीमपूरचा विषय़ संपला असल्याचा दावा केला आहे. प्रशासनासोबत चर्चा झाली असून पीडित शेतकरी कुटुंबियांचे समाधान झाले आहे. शेतकऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले असून यावर त्यांचा विश्वास आहे असंही टिकैत म्हणाले.

लखीमपूरमध्ये घटनास्थळी फक्त राकेश टिकैत हेच कसे पोहचले याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की, पोलिसांनी नाका उभा करण्याआधीच मी लखीमपूरला गेलो होतो. लखीमपूर प्रकरणी सरकारसोबत झालेल्या चर्चेतून तोडगा निघाला असल्याचं सांगताना टिकैत म्हणाले की, हा विषय आता संपला आहे. मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ४५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसंच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीसुद्धा दिली जाईल. याशिवाय जखमी झालेल्यांना दहा लाख रुपये देण्यात येतील.

हेही वाचा: Lakhimpur Kheri violence: लखीमपूरला जाणारच, राहुल गांधींचा निर्धार

शेतकरी आणि प्रशासनात जी चर्चा झाली त्यात देण्यात आलेलं आश्वासन हे लेखी स्वरुपात नाही. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आले आहे. कलम ३०२ सह इतर कलमांतर्गत गुन्हा नोंद झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई आणि जखमींना आर्थिक मदत दोन ते तीन दिवसांत खात्यावर जमा होईल अशी माहितीसुद्धा राकेश टिकैत यांनी दिली.

लखीमपूरमध्ये जाऊन पीडित कुटुंबियांची भेट घेण्याचा अनेक नेते प्रयत्न करत आहेत. मात्र कलम १४४ लागू केले असल्यानं लखीमपूरमध्ये कोणालाही प्रवेश देण्यात येत नाही. तरीही राकेश टिकैत हे मात्र गाझीपूरहून लखीमपूरला पोहोचले. यावर राकेश टिकैत म्हणाले की, पोलिसांनी नाकाबंदी करण्याआधीच मी निघालो होतो. रात्री २ वाजण्याच्या सुमारास बरेलीत पोहोचलो होतो. तिथं मोठ्या संख्येनं शेतकरी जमले होतो. सरकारने नेत्यांऐवजी बहुतेक शेतकऱ्यांना वाट देण्यास परवानगी दिली असावी.

loading image
go to top