टोळी सोडणाऱ्या माकडास कोणी विचारत नाही

वृत्तसंस्था
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी आणि शहा यांनी नितीशकुमार यांच्यासोबत चर्चा का केली नाही, कारण त्यांना यांचे चारित्र्य चांगलेच ठावूक आहे. या नव्या आघाडीसमोर मोदी आणि शहा गुडघे टेकवणार नाहीत, असा चिमटा काढत त्यांनी नोकरशहांना कॅबिनेट मंत्री करायला हवे होते, त्यांच्या अनुभवाचा सरकारला लाभ झाला असता, असे सांगितले

नवी दिल्ली - ताज्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना आणि संयुक्त जनता दल या भाजपच्या घटक पक्षांना स्थान न मिळाल्याने विरोधकांनी त्यांना टोमणे मारायला सुरवात केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी आज नितीशकुमार यांची चांगलीच फिरकी घेतली. दोन दगडांवर पाय ठेवणारे नेहमीच अडचणीत सापडतात. टोळीतून बाहेर पडलेल्या माकडाला कोणी विचारत नसतं, असा टोला त्यांनी लगावला.

दिल्लीत शपथविधी समारंभानंतर लालूप्रसाद यांनी लगेच ट्विट करून नितीश यांना लक्ष्य केले. पंतप्रधान मोदी अथवा अमित शहा या पैकी कोणीच नितीश यांना मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती दिली नव्हती. संयुक्त जनता दलाच्या काही नेत्यांनी नवे कुर्ते आणि पायजामेही खरेदी केले होते; पण त्यांना दिल्लीतून आमंत्रणच आले नाही, असे लालूप्रसाद यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी आणि शहा यांनी नितीशकुमार यांच्यासोबत चर्चा का केली नाही, कारण त्यांना यांचे चारित्र्य चांगलेच ठावूक आहे. या नव्या आघाडीसमोर मोदी आणि शहा गुडघे टेकवणार नाहीत, असा चिमटा काढत त्यांनी नोकरशहांना कॅबिनेट मंत्री करायला हवे होते, त्यांच्या अनुभवाचा सरकारला लाभ झाला असता, असे सांगितले.

महिलेस घेरी
शपथविधी समारंभाला सुरवात होण्यासाठी काहीक्षण बाकी असताना या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या एका महिलेला घेरी आल्याने ती जागेवर कोसळली. यानंतर काहीक्षणांमध्ये तिला स्ट्रेचरवरून बाहेर नेण्यात आले. पुढे राष्ट्रपतींच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने या महिलेस सावरत तिच्यावर प्रथमोपचार केले. रक्तदाब कमी झाल्याने या महिलेस घेरी आल्याचे बोलले जाते.

राष्ट्रपतींकडून दुरुस्ती
पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हिंदीमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. या वेळी प्रधान यांनी दोन शब्दांचा चुकीचा उच्चार केल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ही चूक दुरुस्त करण्यास सांगत त्यांच्याकडून त्या दोन शब्दांचा पुन्हा उच्चार करवून घेतला. कोविंद हे बिहारचे राज्यपाल असतानाही त्यांनी लालूपुत्र तेजप्रताप यादव यांच्या शपथविधीप्रसंगीही अशाच प्रकारची चूक त्यांच्या ध्यानात आणून दिली होती.

शपथविधीत
सीतारामन, कन्नथनम यांनी घेतली इंग्रजीत शपथ
विरोधकांकडून केवळ गुलाम नबी आझाद उपस्थित
राजीनामा दिलेले कलराज मिश्रा, बलियान यांची हजेरी
अडवानी, मुरलीमनोहर जोशी समारंभास अनुपस्थित
शपथविधीनंतर पंतप्रधान मोदी चीनला रवाना

Web Title: laluprasad yadav nitish kumar bihar bjp