
इथं फक्त इंग्रजी; हिंदीतून बाजू मांडणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने रोखलं
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आज एका याचिकाकर्त्याला हिंदीतून (हिंदी) बाजू मांडण्यास रोखले. तसेच या कोर्टाची भाषा इंग्रजी आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा इंग्रजीतच मांडा, अशा सूचनाही केल्या. शंकर लाल शर्मा नावाचा याचिकाकर्ता स्वत:च आपली केस घेऊन सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. (supreme court news in Marathi)
शंकर लाल यांना इंग्रजीचे ज्ञान नाही. त्यांना इंग्रजी बोलता येत नसल्याने इंग्रजीही समजत नव्हते. शंकर लाल नावाच्या जेव्हा हिंदीत आपली बाजू मांडायला लागले, तेव्हा न्यायमूर्ती के.एम.जोसेफ आणि हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने त्यांना रोखळे आणि त्यांना कायदेशीर मदतीसाठी वकील उपलब्ध करून दिला. यावेळी शंकर लाल यांना कोर्ट काय म्हणतंय ते देखील समजत नव्हतं.
हेही वाचा : महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....
शंकर लाल यांनी आपली बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडतांना म्हटलं की, आपण अनेक न्यायालयांमध्ये गेलो. मात्र आपल्याला दिलासा मिळालेला नाही. त्यावर न्यायमूर्ती जोसेफ यांनी शंकर लाल शर्मा यांना सांगितले की, "आम्ही तुमच्या केसची फाईल पाहिली आहे. तुमची केस खूप गुंतागुंतीची आहे. तसेच तुम्ही काय म्हणताय ते आम्हाला समजत नाही.
न्यायमूर्ती जोसेफ म्हणाले की 'या कोर्टाची भाषा इंग्रजी आहे. जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला एक वकील देऊ शकतो जो तुमची बाजू मांडेल. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल माधवी दिवाण यांनी शंकर लाल शर्मा यांच्या मदतीला धावून येऊन सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय याचा अनुवाद करून समजावलं.
सॉलिसिटर जनरल माधवी दिवाण यांनी शंकर लाल शर्मा यांच्याशी बोलल्यानंतर खंडपीठाला सांगितले की, याचिकाकर्ते आपली बाजू मांडू शकतील असा कायदेशीर मदत करणारा वकील घेण्याचा कोर्टाचा प्रस्ताव स्वीकारण्यास तयार आहे. त्यानंतर खंडपीठाने शंकर लाल शर्मा यांच्या मागे बसलेल्या एका वकिलाला विचारले की ते याचिकाकर्त्याला मदत करू शकतात का?
दरम्यान खंडपीठाच्या प्रश्नावर या वकिलाने सहमतीने उत्तर दिले असता खंडपीठाने वकिलाला विचारले की, तुम्ही फी न आकारता हा खटला लढत असाल, अशी आशा करूया, तेव्हा वकिलाने उत्तर दिले की, होय मी हा खटला विनामूल्य लढेन. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ डिसेंबर रोजी ठेवली आणि वकिलांना खटल्याची फाइल पाहण्यास सांगितले.