Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Latest Marathi News Live Update
Latest Marathi News Live UpdateSakal

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद

शेतकरी आंदोलनाच्या पाश्वभूमीवर हरियाणा राज्यातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, हिसार, फतेहाबाद आणि सिरसा या जिल्ह्यांमध्ये व्हॉईस कॉल वगळता मोबाइल इंटरनेट सेवा, बल्क एसएमएस सेवा खंडीत करण्यात आली आहे. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 ते 13 फेब्रुवारी रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

पुण्यातील औंध भागात गोळीबार, आरोपीने स्वतःवरही झाडली गोळी

पैशांच्या वादातून पुण्यातील औंध भागात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. एकाने दुसऱ्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वतःवरदेखील गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.

मी सध्या काँग्रेस पक्षातच आहे; झीशान सिद्दीकींची प्रतिक्रिया

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांनी मात्र सावध भूमिका घेत मी सध्या काँग्रेसमध्येच असल्याचं म्हटलंय.

बाबा सिद्दीकींचा थोड्याच वेळात प्रवेश

काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. आज शनिवारी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

मोदी सरकारच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेची विक्रमी घोडदौड - विश्वास पाठक

मोदी सरकारच्या कार्यकाळात आर्थिक क्षेत्रात अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळे देशाची विक्रमी वेगाने प्रगती झाली आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी शनिवारी केले. यूपीए सरकारच्या काळातील आर्थिक गैरव्यवहार आणि ढिसाळ,भ्रष्ट कारभाराचे काळे वास्तव जनतेसमोर ठेवणे गरजेचे होते म्हणूनच केंद्र सरकारने संसदेत श्वेतपत्रिका सादर केली असल्याचे यांनी नमूद केले.

काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी घेतली ठाकरेंची भेट

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मातोश्री येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आ. वर्षाताई गायकवाड, शिवसेना नेते खा.संजय राऊत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन नाना गावंडे आदि उपस्थित होते.

Kokan Politics: भास्कर जाधवला मी सोडणार नाही : नारायण राणे

भास्कर जाधव माझ्यावर टीका करत आहे. मात्र मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. पण एक दिवस चोप मात्र नक्की देणार, असे नारायण राणे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची केंद्र सरकारला शिफारस करा - नाना पटोले.

महाराष्ट्रात गुंडाराज सुरु असून बंदुकीच्या धाकाने दबावतंत्र चालवले जात आहे, जाती-धर्मात भेद निर्माण केला जात आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. मागील दोन महिन्यातील घटना महाराष्ट्राची प्रतिष्ठा, नावलौकिक धुळीस मिळवणाऱ्या आहेत. राज्यपाल महोदयांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली

कोरोना काळात खासदारांनी आपल्या मानधनातील ३० टक्के रक्कम दिली - नरेंद्र मोदी

कोरोना काळात खासदारांनी आपल्या मानधनातील ३० टक्के रक्कम दिली असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत म्हणाले.

Mumbai News: विकासाला साथ देण्यासाठी ५३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश - एकनाथ शिंदे

राज्य सरकाराच्या माध्यमातून मागील काही दिवसापासून मुंबईत डिप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रदुषण कमी होण्यास मदत झाली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकास कामे केली जात आहेत. त्यामुळे विकासाला साथ देण्यासाठी आतापर्यंत मुंबईतील ५३ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Mumbai News: कोल्ड कॉफीवरून शिंदे ठाकरे गटात कोल्ड वॉर

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोक आहेत ते आपली जागा शोधण्याच काम करत आहेत. त्यांना नवीन कार्यकर्ते, लोक मिळत नाहीत. ते शोधण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाला येथे यावे लागते हीच मोठी शोकांतिका आहे असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटाला टोला हाणला आहे. त्या गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला देखील माणस मिळणार नाहीत असे सांगत त्यांनी युवानेते आदित्य यांना प्रतिउत्तर देऊ केले आहे.

PM Modi UAE: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा जाणार संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीला (UAE) अधिकृत भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी यांची 2015 पासूनची UAE ला सातवी आणि गेल्या आठ महिन्यांतील तिसरी भेट असणार आहे.

Arvind Kejriwal: पंजाबमध्ये इंडीया आघाडी मोडली

2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच 'इंडीया आघाडी'मध्ये परिस्थिती बिघडताना दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील इंडीया आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये आप लोकसभेच्या सर्व जागा लढवणार आहे.

Congress: कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी काँग्रेसने  केली आहे

राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या गोळीबार, हल्ला प्रकरणावरून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी काँग्रेसने  केली आहे.

Congress
CongressSakal
Congress
CongressSakal

Asaduddin Owaisi: मी प्रभू रामाचा आदर करतो, पण..; असदुद्दीन ओवैसी यांची सरकारवर टीका

लोकसभेत राम मंदिर विषयावरील चर्चेदरम्यान एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "मला विचारायचे आहे की मोदी सरकार हे एका विशिष्ट समुदायाचे, धर्माचे सरकार आहे की संपूर्ण देशाचे सरकार आहे?" मी प्रभू रामाचा आदर करतो, पण मी नथुराम गोडसेचा तिरस्कार करतो कारण ज्याचे शेवटचे शब्द हे राम होते त्या माणसाला त्याने मारले."

Crime News : मला या प्रकरणात गोवलं जातंय, अमरेंद्र मिश्राचा दावा 

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला पोलिसांनी आज अटक केली. हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदूक ही मिश्राच्या नावावर होती. यावेळी आपण काही केलं नसून, आपल्याला या प्रकरणात गोवलं जातंय आणि आपल्यावर अन्याय होतोय असं त्याने म्हटलं आहे.

Devendra Fadanvis : उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झालाय

अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेत काही प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत विचारणा केली असता देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. "उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांना मी एवढंच म्हणेल, की गेट वेल सून" असं फडणवीस म्हणाले.

Amit Shah : राम मंदिराचा राजकीय वापर केला नाही

राम मंदिरासाठी देशभरात आंदोलनं झाली. पंतप्रधान मोदींनी देखील प्राणप्रतिष्ठेसाठी 11 दिवस उपवास केला. मुख्य कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी राजकीय घोषणा केल्या नाहीत. मोदींनी आणि भाजपने श्रीराम मंदिराचा राजकीय वापर केला नाही, असं अमित शाह आज लोकसभेत म्हणाले.

Amit Shah : मोदीजी जो बोलते है, वो करते है

अमित शाह आज लोकसभेत बोलत आहेत. यावेळी त्यांनी राम मंदिर आणि इतर आश्वासनांवरुन विरोधकांचा समाचार घेतला. भाजपने काही आश्वासन दिलं तर त्यावर चुनावी जुमला म्हणून टीका केली जाते, आणि ते पूर्ण केलं तर त्यावरही टीका केली जाते. मोदीजी जे बोलतात, ते करून दाखवतात; असंही अमित शाह म्हणाले.

Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये दाखल

आज नाशिकमध्ये भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या मतदार संघातील विकासकामांचे फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये पोहचले आहेत. त्यांचं ढोल-ताशाच्या गजरात स्वागत झालं. हिरावाडीतील स्व. सदाशिव भोरे कलामंदिराचं फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

Crime News: मॉरिसच्या सुरक्षा रक्षकाला १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

मॉरिसचा सुरक्षा रक्षक अमरेंद्र मिश्रा याला १३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी तपास सुरु आहे.

IMRAN Khan Pakistan Election: इम्रान खान यांना मोठा दिलासा; 12 प्रकरणांमध्ये जामीन

पाकिस्तानच्या निवडणुकीमध्ये इम्रान खान चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. त्यातच त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विविध १२ प्रकरणात त्यांना जामीन मिळाला आहे.

Devotees throng the Ram Janmabhoomi : उत्तर प्रदेशमध्ये राम लल्लाच्या दर्शनासाठी लोकांची तुफान गर्दी; पाहा व्हिडिओ

२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम लल्लाची प्रतिष्ठापणा झाली आहे. तेव्हापासून लोक प्रभू रामाच्या दर्शनसाठी मोठ्या प्रमाणात अयोध्येत जात आहे. भाविकांच्या तुफान गर्दीचा एक व्हिडिओ एएनआयने शेअर केला आहे.

Shrikant Shinde : आम्ही धर्माचे ठेकेदार नाही, तर धर्माचे सुरक्षा रक्षक- श्रीकांत शिंदे

लोकसभेत बोलताना श्रीकांत शिंदे औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांना संभाजीनगर नाव आवडलं नाही. औरंगजेबाच्या नावावरुन औरंगाबाद नाव ठेवण्यात आलं होतं. आम्ही धर्माचे ठेकदार नाही आम्ही धर्माचे रक्षक आहोत, असं ते म्हणाले.

Manoj Jarange Patil: आधी गुलाल उधळला, मग आता उपोषण कशासाठी; विजय वडेट्टीवारांचा सवाल

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज पुन्हा उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे. आधी गुलाल उधळला, मग आता उपोषण का करत आहात, असा सवाल त्यांनी केला आहे.

Congress Meeting Governer: राज्यातील कायदा-सुव्यवस्थेप्रकरणी काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार

गेल्या काही दिवसात राज्यात भडक गुन्हेगारी घटना घडल्या आहेत. याप्रकरणी काँग्रेसचे शिष्टमंडळ आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार असून निवेदन देणार आहेत.

संतोष बांगर यांना मतांचा रोग झालाय- विजय वडेट्टीवर

संतोष बांगर यांचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते शालेय विद्यार्थ्यांना त्यांना मतदान करण्याचे सांगत होते. यावर विजय वडेट्टीवारांनी टीका केली. वडेट्टीवार म्हणाले की, 'संतोष बांगर यांना मतांचा रोग झालाय.'

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी CMLR प्रोजेक्टला मंजूरी मिळावी यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिलं आहे.

उर्वरित ३ कसोटी सामन्यांसाठी BCCIकडून भारतीय संघ जाहीर

सध्या भारत आणि इंग्लंड या संघात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दोन सामने खेळवले गेले आहेत. उर्वरित सामन्यांसाठी BCCIकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

हल्द्वानीच्या घटनेनंतर पोलिसांची कारवाई, ५००० जणांविरुद्ध नोंदवण्यात आला गुन्हा

उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये मोठा हिंसाचार उफाळला होता. घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांकडून १९ ओळख पटलेल्या आणि ५००० अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अटकेची कारवाईही सुरु करण्यात आली आहे.

गुजरातमधील पॅकेजिंग कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

गुजरातच्या अंलकेश्वर जीआयडीसी परिसरातील एका पॅकेजिंग कंपनीला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले आत आहेत.

 Ajit Pawar News : अजित पवार आज चंदगड मतदारसंघाच्या दौऱ्यावर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दडहिंग्लज चंदगडच्या दौऱ्यावर आहेत. याठिकाणी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ केला जाणार आहे. तसेच अजि पवार शेतकरी मेळाव्याला देखील उपस्थित राहाणार आहेत. यावेली चंद्रकांत पाटील आणि धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहाणार आहेत

गुजरातमध्ये जैन पॅकेजिंग कंपनीला भीषण आग  

गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर GIDC मधील जैन पॅकेजिंग कंपनीला आग लागली . घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे.

समीर वानखेडे यांच्याविरोधात ईडीने दाखल केला गुन्हा

ईडीकडून मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने आता समीर वानखेडेविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ईडीने एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले आहे.

Mumbai Local News : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत

शहाड ते कल्याण दरम्यान सिग्नल मिळत नसल्याने लोकल गाड्या उभ्या राहिल्या आहेत. सिग्नल मिळत नसल्याने सीएमएसटीकडे जाणाऱ्या अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे सकाळी कामावर जाण्याच्या घाईत असलेल्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नेल्लोर जिल्ह्यातील भीषण अपघात!  चार ठार तर १५ जण जखमी

आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील मुसुनुरु टोल प्लाझा येथे बसला ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात चार ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. कावली डीएसपी व्यंकटरमण यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

Chalisgaon Firing Case : चाळीसगावचे माजी नगरसेवक महेंद्र मोरेंचा उपचारादरम्यान मृत्यू; तीन दिवसांपूर्वी झाला होता गोळीबार

जळगाव : तीन दिवसांपूर्वी चाळीसगावमधील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत त्यांना एकूण सात गोळ्या लागल्या होत्या. उपचारादरम्यान आज पहाटे रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

ED Notice : माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नीच्या अडचणीत वाढ; ED ने बजावली नोटीस

माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्या पत्नी आणि डॉ. झाकीर हुसेन मेमोरियल ट्रस्टच्या प्रकल्प संचालक लुईस खुर्शीद यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकीकडं न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलंय, तर दुसरीकडं अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) त्यांना नोटीसही पाठवली आहे. ईडीच्या लखनौ झोन कार्यालयानं त्यांना १५ फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलावलं आहे.

Ajit Pawar :  उपमुख्यमंत्री अजित पवार आज गडहिंग्लज, चंदगड दौऱ्यावर

गडहिंग्लज : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (ता. १०) गडहिंग्लज व चंदगड दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह मिळाल्यानंतर होणाऱ्या त्यांच्या दौऱ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्व आले आहे.

खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या साथीदाराच्या घरावर हल्ला, कॅनडात दोघांना अटक

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याचा सहकारी सिमरनजीत सिंग याच्या घरी गेल्या आठवड्यात (कॅनडा) झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 1.21 वाजता सरे येथील सिमरनजीत सिंगच्या घरावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. सिमरनजीत सिंग हा खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरचा खास व्यक्ती आहे.

Ambabai Temple : अंबाबाई मंदिर विकास आराखडाप्रश्‍नी आज बैठक

कोल्हापूर : महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी असोसिएशनतर्फे श्री अंबाबाई मंदिर विकास आराखडा संदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी आज (ता.१०) दुपारी साडेचार वाजता मंगलधाम येथे बैठक होणार आहे. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस महेश जाधव, चंद्रकांत यादव, अध्यक्ष शामराव जोशी व मंगलधामचे अध्यक्ष संतोष कोडोलीकर उपस्थिती असणार असल्याची माहिती असोसिएशनतर्फे देण्यात आली.

Samriddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे जखमी

समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघात घडलाय. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात हा अपघात झाला आहे. शिर्डीकडे भरधाव जाणारी कार रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरचालकाला धडकल्यानंतर कंटेनरवर दूर जाऊन आदळली. ज्यात कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी आहेत. राहुल राजभोज, उमेश उगले, भाऊसाहेब पैठणे असे मृत व्यक्तींची नावं आहेत. समृद्धी महामार्गावर रात्री 11 च्या सुमारास कारचा अपघात झाल्याची माहिती आहे.

Budget Session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवट दिवस

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपने शुक्रवारी व्हीप जारी करून आपल्या खासदारांना शनिवारी दोन्ही सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिलेत. अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारा ठराव संसद पारित करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Pakistan Election : पाकिस्तान निवडणुकीत इम्रान खान यांची  'पीटीआय'  आघाडीवर

इस्लामाबाद : हिंसाचार व गैरप्रकारांमुळे गाजत असलेल्या पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ (पीटीआय) पक्षाने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार आघाडीवर असून पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज गट) आणि बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या दोन बड्या पक्षांना त्यांनी पिछाडीवर टाकले आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ‘पीटीआय’ ५५, पाकिस्तान मुस्लिम लीग ४३ आणि ‘पीपीपी’ला ३५जागांवर आघाडीवर होते. पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते नवाज शरीफ यांनी सरकार स्थापन करण्यासाठी इतर पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे आजपासून अंतरवालीत बेमुदत उपोषण

वडीगोद्री (ता. अंबड, जि. जालना) : मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शासनाने कुणबी प्रमाणत्र देताना सगेसोयऱ्यांचाही समावेश करावा, तसा कायदा मंजूर करावा, मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे अधिवेशन त्वरित घ्यावे, आरक्षण अधिसूचना व मसुद्याची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे आज, शनिवारपासून (ता. १०) अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे समाजबांधवांची बैठक घेऊन बेमुदत उपोषणाला सुरवात करणार आहेत.

Jeevan Gaurav Award : डॉ. रवींद्र शोभणे यांना जीवन गौरव पुरस्कार

Latest Marathi News Live Update : भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि डॉक्टर एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोंनी X वर फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिलीये. तसेच ठाकरे गटाचे नेते व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आजपासून अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे बेमुदत उपोषणाला सुरवात करणार आहेत. त्याचबरोबर विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ (पीटीआय) पक्षाने पुरस्कृत केलेले अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. तसेच देशभरात वातावरणातही बदल जाणवत आहे. काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com