गोवा ते तिरुपती या पॅकेज टुरचे लाँचिंग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जुलै 2018

गोमन्तकीयांना तिरूपतीचे दर्शन घेता यावे म्हणून ही सेवा सुरू करण्यात आलेली असून या सेवेच्या माध्यमातून अवघ्या 90 मिनिटांच्या आत तिरूपतीचे दर्शन गोमन्तकीयांना घेता येणार असल्याने या सेवेचा सर्वांनी लाभ घेण्याचे' आवाहन पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी केले. 

पणजी - 'आज गोवा ते तिरुपती या धार्मिक सहलीला झेंडा दाखवताना मला आनंद होत आहे आणि मी या उपक्रमाला प्रदीर्घ यश चिंततो. गोमन्तकीयांना तिरूपतीचे दर्शन घेता यावे म्हणून ही सेवा सुरू करण्यात आलेली असून या सेवेच्या माध्यमातून अवघ्या 90 मिनिटांच्या आत तिरूपतीचे दर्शन गोमन्तकीयांना घेता येणार असल्याने या सेवेचा सर्वांनी लाभ घेण्याचे' आवाहन पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर यांनी केले. पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर यांनी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) गोवा ते तिरुपती या पॅकेज टुरचे लाँचिंग केले, यावेळी ते बोलत होते.

जीटीडीसीने सीबर्ड ट्रॅव्हल्सच्या सहकार्याने तिरुपतीला जाणारी ही धार्मिक सहल लॉंच केली असून त्याअंतर्गत गोवा ते तिरुपती मार्गावर दैनंदिन बस उपलब्ध करून दिली जाणार आहे व ती दोन दिवस आणि तीन रात्रीचा प्रवास करून परतणार आहे. मल्टी- अक्‍सल व्होल्व्हो एसी सेमी- स्लिपर कोच सेवा म्हापसा येथून सुरू होईल आणि वाटेवरील (पणजी, वेर्णा, मडगाव, कुंकोळी आणि कॅनाकोना) प्रवाशांना पीक अप करून बेंगळुरूमार्गे तिरुपतीला रवाना होईल. 

प्रवास कार्यक्रमात बेंगळुरू येथे थांबा असेल, ज्यामध्ये यात्रेकरूंना स्थळदर्शन करता येईल किंवा राहण्याच्या सोयीचा अतिरिक्त पैसे भरून लाभ घेता येईल. या पॅकेजचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ एक ते दीड तासात मिळणारे दर्शन जे घेण्यासाठी एरवी किमान पाच ते सहा तास थांबावे लागते. त्याशिवाय पॅकेजमध्ये तिरूमला येथे बालाजी दर्शनासाठी खास प्रवेश, प्रसाद तसेच तिरूमला येथे जाण्यापूर्वी अलामेलू, मंगपुरा येथे पद्मावती देवीचे दर्शन यांचा समावेश असेल. चार हजार रुपये किमतीच्या या प्रवासात एपीएसआरटीसीची तिरुपती ते तिरूमला लिंक कोच, गाइड आणि दर्शन तिकिटाचा समावेश असेल. यामध्ये एक मोफत नाश्‍ता आणि तिरुपती येथे दुपारच्या जेवणाचा समावेशही असेल.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Launching of goa to tirupati tour package