30 वर्षे एकट्याने खोदला कालवा; महिंद्राने ट्रॅक्टर भेट देऊन केला सन्मान

Laungi Bhuiya
Laungi Bhuiya

गया : उभा डोंगर चिरुन त्यातून रस्ता साकारणाऱ्या बिहारच्या माऊंटन मॅन दशरथ मांझीला सगळेच ओळखतात. परंतु, अगदी अलिकडेच दशरथ मांझींच्या कर्तुत्वासारखीच पुनरावृत्ती करणारी घटना समोर आली होती. लौंगी भुईया या बिहारच्या व्यक्तीने असाच एक कारनामा केला होता जो पाहून सगळेच अवाक झाले होते. सलग तीस वर्ष एकट्यानेच मेहनत घेऊन जवळपास तीन किलोमीटर लांब असा कालवा यांनी खोदला होता. त्यांच्या या अफाट कर्तुत्वानंतर ते सतत माध्यमांच्या चर्चेत राहिले होते. ही
अचाट कामगिरी करणाऱ्या लौंगी भुईया यांना महिंद्रा समूहाचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी ट्रॅक्टर देऊन सन्मान केला आहे.  

रोहीन वर्मा नावाच्या एका पत्रकाराने केलेल्या ट्विटला शनिवारी उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी ही ट्रॅक्टर देण्याची घोषणा केली होती. 18 सप्टेंबरला एका पत्रकाराने ट्विवरवर एक ट्विट केलं होतं. त्यात म्हटलं होतं की, गयामध्ये राहणाऱ्या लौंगी भुईया यांनी आपल्या आयुष्यातील 30 वर्षे एक कालवा खोदायला दिली आहेत. एका ट्रॅक्टरशिवाय त्यांना आता काही नको आहे. त्यांनी मला म्हटलं आहे की, त्यांना एखादा ट्रॅक्टर मिळाला तर त्यांना खूप मदत होईल. या ट्विटमध्ये त्या पत्रकाराने आनंद महिंद्रा यांना विनंती करत म्हटलं की, जर आपण त्यांना त्यांच्या या अभूतपुर्व कामाबद्दल सन्मानित केलंत तर ही अभिमानाची बाब ठरेल. 

या ट्विटला प्रत्युत्तर देत आनंद महिंद्रा यांनी म्हटलं की, त्यांना ट्रॅक्टर देणं ही सौभाग्याची गोष्ट असेल. तुम्हाला माहित असेल की, मी आधीही एक ट्विट केलं होतं ज्यात मी म्हटलं होतं की, त्यांनी महत्प्रयासाने खोदलेला कालवा हा एखाद्या ताजमहल वा पिरॅमिडइतकाच प्रभावशाली आहे. त्यांना ट्रॅक्टर गिफ्ट करणं आणि त्याचा वापर त्यांनी करणं ही आमच्यासाठी एक सन्मानाचीच गोष्ट ठरेल. यासोबतच त्यांनी त्या पत्रकारला हेही विचारलं की, आमची टिम त्यांच्यापर्यंत कशी पोहचू शकते?

लगेचच आनंद महिंद्रा यांनी गया भागातील सिद्धनाथ विश्वकर्मा या आपल्या डिलरला यासंदर्भातील सुचनाही दिल्या. सिद्धनाथ यांनी म्हटलं की, मी या साऱ्या प्रक्रियेचा एक भाग बनतोय, यातच मला आनंद आहे.

लौंगी भुईया यांना थेट आनंद महिंद्रा यांच्याडूनच ट्रॅक्टर भेट मिळाल्यामुळे, या घटनेनं तेदेखील आनंदात आहेत. 

असं म्हटलं जातं की, मनात जिद्द असेल तर या दुनियेत काहीही अशक्य नाही. कितीही अडचणी, संकटे आली तरीही माणूस त्याला पुरून उरु शकतो. असंच काहीसं कर्तुत्व लौंगी भुईया यांनी केलं आहे. त्यांच्या गावात सिंचनाच्या समस्येमुळे खूप अडचणी यायच्या. आणि म्हणूनच त्यांनी स्वकष्टाने कालवा खोदण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कुंटुंबानेही कधी त्यांना अडवलं नाही. 

लौंगी भुईया यांनी सांगितलं की, गावात जवळच एक तलाव आहे. त्यात पुष्कळ पाणीदेखील आहे. परंतु, केवळ सिंचनाची समस्या असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवायचा. यातूनच एक कालवा खोदण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली. या तलावापासून एक कालवा खोदला तर शेतापर्यंत पाणी पोहचवलं जाऊ शकतं. हाच विचार करुन त्यांनी मग एक कुदळ आणि काही घरगुती अवजारे घेऊन खोदकाम सुरु केलं. आणि निव्वळ चिकाटीच्या जोरावर त्यांनी सलग 30 वर्षांच्या मेहनतीने हा कालवा बनवण्यात यश प्राप्त केलं.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com