चिन्मयानंदांवर बलात्काराचा आरोप लावणाऱ्या युवतीने बदलला जबाब

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020

पीडित विद्यार्थीनीने आपला जबाब बदलल्याने आता माजी खासदार चिन्मयानंद यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी दिल्ली : माजी गृहराज्यमंत्री चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप लावणाऱ्या विद्यार्थ्यांनीने आपल्या आरोपांपासून काढता पाय घेतला आहे. मंगळवारी लखनऊच्या एका विशेष MP-MLA न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर आधी लावलेल्या आरोपांवर ठाम राहण्यापासून ही युवती मागे हटली आहे. आधी दिलेली तक्रार आणि दिलेला जबाब यावर ठाम न राहता तिने आपला जबाब बदलल्याची माहीती समोर आली आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार लखनऊच्या विशेष MP-MLA न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होत होती. शाहजहांपूरच्या प्रकरणात चिन्मयानंद यांना अटक होऊन जवळपास पाच महिने तुरुंगात रहावं लागलं होतं. 

कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या या 23 वर्षीय युवतीने आपल्या आरोपांवर ठाम न राहता मागे हटल्यामुळे आश्चर्यचकीत झालेल्या फिर्यादी पक्षाने या विद्यार्थीनीच्या विरोधात बदनामीचा आरोप केला आहे. तसेच आपला जबाब बदलला म्हणून कलम 340 अन्वये खटला दाखल करण्यासाठी अर्ज दाखल केला. कोर्टाने हा अर्ज स्विकारला आहे. तसेच या विद्यार्थीनीला नोटीस पाठवून उत्तर देण्यासही सांगितलं आहे. या प्रकरणात पुढची सुनावणी 15 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 

हेही वाचा - Bihar Election: बेरोजगारी, भूकबळीवर काय म्हणणं आहे ? नित्यानंदांच्या वक्तव्यावर तेजस्वींचा पलटवार

पीडित विद्यार्थीनीने आपला जबाब बदलल्याने आता माजी खासदार चिन्मयानंद यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शाहजहांपूरमध्ये चिन्मयानंद यांच्या कॉलेजमध्ये एलएलएम करणाऱ्या या विद्यार्थीनीने त्यांच्याविरोधात बलात्काराचे आरोप लावले होते. 5 सप्टेंबर 2019 रोजी दिल्लीतील लोधी कॉलनी पोलिस स्टेशनमध्ये तिने चिन्मयानंद यांच्याविरोधात बलात्कार आणि धमकी देण्याची तक्रार केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी खासदार चिन्मयानंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. 

हेही वाचा - आसाममधील मदरसे होणार बंद; फसवणुकीने होणाऱ्या हिंदू-मुस्लिम विवाहांनाही आळा

याआधी 28 ऑगस्ट 2019 रोजी विद्यार्थीनीच्या वडीलांनी शाहजहांपुरमध्ये तिच्या गायब होण्याची तक्रार नोंदवली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने SIT ची स्थापना केली होती. या प्रकरणात 20 सप्टेंबर 2019 रोजी चिन्मयानंद यांना अटक झाली होती. जवळपास पाच महिने तुरुंगात राहील्यानंतर चिन्मयानंद यांना तीन फेब्रुवारी 2020 रोजी अलाहाबाद हायकोर्टातून जामीन मंजूर झाला होता. चिन्मयानंद यांच्याविरोधात कलम 376C, 354D, 342, 506 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या  प्रकरणात आतापर्यंत जवळपास 33 साक्षीदारांच्या साक्षी आणि 29 कागदोपत्री साक्ष नोंदवण्यात आल्या आहेत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: law student retracts from allegation against former minister chinmayanand