कोलकाता न्यायालयाबाहेर चिदंबरम यांना दाखवले काळे झेंडे, काँग्रेस नेत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

P Chidambaram Calcutta High Court

काँग्रेस नेते पी चिदंबरम यांना कलकत्ता उच्च न्यायालयाबाहेर काही वकिलांच्या विरोधाला सामोरं जावं लागलंय.

कोलकाता न्यायालयाबाहेर चिदंबरम यांना दाखवले काळे झेंडे

P Chidambaram Calcutta High Court : काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील पी चिदंबरम (P Chidambaram) यांना कलकत्ता उच्च न्यायालयाबाहेर काही वकिलांच्या विरोधाला सामोरं जावं लागलंय. चिदंबरम एका खटल्याच्या सुनावणीसाठी वकील म्हणून इथं आले होते. त्यामुळं काँग्रेसचं समर्थन करणारे काही वकील संतप्त झाले आणि त्यांनी चिदंबरम यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. शिवाय, त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले.

चिदंबरम यांचा विरोध का?

खरं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चिदंबरम हे क्व्हेंटर कंपनीच्या वतीनं कलकत्ता उच्च न्यायालयात हजर झाले होते. या कंपनीच्या शेअर खरेदीत झालेल्या घोटाळ्याबाबत पश्चिम बंगाल काँग्रेस सातत्यानं प्रश्न उपस्थित करत आहे, त्यामुळंच आता चिदंबरम यांना विरोध होत आहे. चिदंबरम हे काँग्रेस पक्षाच्या भावनांशी खेळत असल्याचा दावा आंदोलनकर्त्या वकिलांनी केलाय. दरम्यान, कंपनीच्या वतीनं न्यायालयात हजर राहणं योग्य नसल्याचं पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर चौधरी यांनी म्हटलंय.

या आंदोलनात सहभागी असलेले वकील कौस्तव बागची (Kaustav Bagchi) म्हणाले, माजी केंद्रीय अर्थमंत्री एका संस्थेच्या वतीनं हजर होत आहेत, ज्यांच्या शेअर्सच्या खरेदीवर पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आक्षेप घेत आहेत. चिदंबरम हे CWC चे (काँग्रेस कार्यकारिणी) सदस्य आहेत आणि एक अतिशय महत्वाचे नेतेही आहेत. आम्ही हा निषेध काँग्रेस कार्यकर्ता म्हणून केलाय, वकील म्हणून नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. या निषेधाच्या आडून काँग्रेसच्या वकिलांनी त्यांना तृणमूल काँग्रेसचा सहानुभूतीदारही म्हटलं होतं. त्याचवेळी काँग्रेसच्या वकिलांनी पश्चिम बंगालमधील पक्षाच्या खराब कामगिरीसाठी चिदंबरम यांना जबाबदार धरलंय. उल्लेखनीय आहे की, पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांच्याविरुद्ध मेट्रो डेअरी प्रकरणात चिदंबरम पश्चिम बंगाल सरकारची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात होते.

काय म्हणाले अधीर रंजन चौधरी?

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, निषेध ही काही काँग्रेस समर्थकांची 'नैसर्गिक' प्रतिक्रिया होती. कलकत्ता उच्च न्यायालयात उपस्थित असलेल्या काही काँग्रेस समर्थकांनी विरोध केल्याचं मी ऐकलंय. व्यावसायिक जगात एखाद्याला स्वतःचा पर्याय निवडण्याचा अधिकार आहे. हे एक व्यावसायिक जग आहे. हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं, त्याला कोणीही निर्देशित करू शकत नाही, असं त्यांनी चिदंबरम यांच्याबाबतीत म्हटलंय.