1 एप्रिलनंतर कोणत्याही महामार्गावर मद्यविक्री नाही

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

"अराईव्ह सेफ' या स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले. या निर्णयामुळे महामार्गांवर मद्यपान करुन गाडी चालविण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा आशावाद खंडपीठाने व्यक्त केला.

नवी दिल्ली - येत्या 1 एप्रिलपासून राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील मद्यविक्रीची सर्व दुकाने बंद करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) दिले. महामार्गांवर मद्यविक्रीची दुकाने 1 एप्रिलपासून दिसावयास नकोत असे बजावताना न्यायालयाने महामार्गांवरील मद्यविक्रीच्या दुकानांच्या परवान्यांचे यानंतर नूतनीकरण केले जाणार नाही, असेही स्पष्ट केले.

"अराईव्ह सेफ' या स्वयंसेवी संस्थेने यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश टी एस ठाकूर, न्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायाधीश एल एन राव यांच्या खंडपीठाने हा निर्णय सुनावला. या निर्णयामुळे महामार्गांवर मद्यपान करुन गाडी चालविण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा आशावाद खंडपीठाने व्यक्त केला.

देशात दरवर्षी होणाऱ्या अपघातांमध्ये सुमारे 1.42 लाख लोक मृत्युमुखी पडतात, अशी माहिती "अराईव्ह सेफ'ने यावेळी न्यायालयास दिली. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांमध्ये मद्यपान केलेल्या नागरिकांचे प्रमाण जास्त असल्याचे या संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले. महामार्गांवर सहज मिळणारे मद्य हेच मद्यप्राशन करुन गाडी चालविण्यामागील मुख्य कारण असल्याची भूमिका या संस्थेकडून घेण्यात आली होती. या पार्श्‍वभूमीवर, न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे.

Web Title: Liquor shops banned on all national, state highways from April 1