काँग्रेसने कष्टाने मिळवलेले मित्र मोदींनी तोडले - राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

अनेक देशांबरोबर मागील अनेक दशकांपासून काँग्रेसने निर्माण केलेले आणि जतन केलेले चांगले संबध मोदींनी संपुष्टात आणले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून सातत्याने मोदी सरकारच्या कार्यपद्धतीवर टिका करताना दिसतात. गेल्या काही दिवसांपासून चीन-भारत सीमावाद आणि अलीकडेच पारित केली गेलेली कृषी विधेयकं यावरही राहुल गांधीनी टिका केली होती. देशाच्या GDP मध्ये ऐतिहासिक घसरण झाल्यावर तर राहुल गांधीनी मोदी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. अलीकडेच त्यांनी चार व्हिडीओजच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा उडालेला बोजवारा लोकांसमोर मांडला होता. 

हेही वाचा - कोरोनावर लस प्रभावी ठरेल अशी शाश्वती नाही - WHO

आज त्यांनी मोदींवर आणखी एक टिका केली आहे. मागील अनेक दशकांपासून शेजारी राष्ट्रांशी मोठ्या कष्टाने निर्माण केलेले व वाढवत नेलेले संबध मोदी सरकारने संपुष्टात आणले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. 

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, अनेक देशांबरोबर मागील अनेक दशकांपासून काँग्रेसने निर्माण केलेले आणि जतन केलेले चांगले संबध मोदींनी संपुष्टात आणले आहेत. आजूबाजूला एकही मित्र देश नसणं ही गोष्ट भारतासाठी धोकादायक आहे.  आपल्या या ट्विटसोबत त्यांनी एका बातमीचा फोटो जोडला आहे. 
बांग्लादेशचे भारतासोबत असलेले संबध बिघडत असून त्यांची चीनशी जवळीक वाढत आहे, असा मथळा असलेली ही बातमी आहे. 

हेही वाचा - कांदा, बटाटा जीवनावश्यक नाही; दुरुस्ती विधेयकाला मंजुरी

गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे देशात नव्हते. सोनिया गांधी यांच्या नियमित आरोग्यविषयक तपासणीसाठी ते अमेरिकेला गेले होते. कालच ते भारतात परतले आहेत. या पावसाळी अधिवेशनात त्यांना हजेरी लावता आली नव्हती. वादग्रस्त ठरलेल्या कृषी विधेयकांच्या चर्चेवेळी ते अनुपस्थित राहीले. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Living in a neighbourhood with no friends is dangerous