esakal | BIhar Election : चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल; म्हणाले, मी मोदींचा आदर का करु नये? 
sakal

बोलून बातमी शोधा

Chirag Paswan

केंद्रात एनडीएला साथ आणि राज्यात मात्र निवडणुकांमध्ये दुरावा असा लोजपाचा पवित्रा आहे.

BIhar Election : चिराग पासवानांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल; म्हणाले, मी मोदींचा आदर का करु नये? 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पाटणा : बिहार विधानसभेची रणधुमाळी आता टीपेला पोहोचली आहे. अवघ्या दहा दिवसांवर आलेल्या या निवडकीमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांचे फड रंगताना दिसत आहेत. राष्ट्रीय पक्ष तसेच अनेक प्रादेशिक पक्ष या बिहार निवडणुकीत नेहमीच महत्वाची भुमिका बजावताना दिसतात. या निवडणुकीत सत्ताधारी नितीश कुमारांच्या जेडीयूसमोर राजद-काँग्रेस महाआघाडीचे आव्हान असणार आहे. तर दुसरीकडे एनडीएला रामराम ठोकत लोकजनशक्ती पार्टीने वेगळी वाट निवडत जेडीयूलाच निशाणा साधला आहे. मात्र, असं करत असताना भाजपशी असलेलं आपलं सख्य तसंच ठेवलं आहे. या पार्श्वभूमीवरच आता चिराग पासवान यांनी वक्तव्य केलं आहे. 

हेही वाचा - राज्यपाल-मुख्यमंत्री पत्रप्रपंचावर अमित शहाचं भाष्य; म्हणाले...

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर टीका करताना त्यांनी म्हटलंय की, मला असं ठामपणे वाटतं की विद्यमान मुख्यमंत्र्यांनी धोरणांवर विचार करणे सोडून दिलं आहे आणि ते आता नवा विचार करु शकत नाहीयत. नव्या नेतृत्वाला अनुनभवी ठरवून ते बेदखल करतात. पण त्यांनीदेखील त्यांचं राजकारण जेपींच्या आंदोलनातून तरुण असतानाच सुरु केलं होतं. आम्हाला देखील कळतं आणि आम्हीदेखील बिहारच्या प्रगतीचा विचार करु शकतो. आणि तसंही या राज्याने त्यांना घसघशीत 15 वर्षे दिली आहे. 

आपण एनडीएपासून वेगळं होऊन लढत आहात तर मोदींच्या नेतृत्वाचा का उल्लेख करता असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, मी नरेंद्र मोदींचा आदर का करु नये? मोदी माझ्या हृदयात आहेत. जेंव्हा माझ्यासोबत कुणी नव्हंतं तेंव्हा ते माझ्यासोबत उभे होते. माझे वडिल जेंव्हा आयसीयूत होते तेंव्हा ते मला दररोज फोन करत होते आणि मला कठीण काळात धीर देत होते. ज्यांनी मला साथ दिली त्यांनी मी विसरुन जाऊ? त्यांच्यापासून वेगळं होऊन निवडणुक लढवतोय म्हणून मी त्यांच्यावर टीका करणे मला शक्य नाही. असं त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा - चीनचा कुटील डाव; भारताशी चर्चा सुरु असतानाही सीमेवर युद्धाभ्यास

या निवडणुकीत रामविलास  पासवान यांनी स्थापन केलेली लोकजनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे निवडणुक लढवत आहे. केंद्रात एनडीएला साथ आणि राज्यात मात्र निवडणुकांमध्ये दुरावा असा लोजपाचा पवित्रा आहे. या निवडणुकीत लोजपाने एनडीएचा घटकपक्ष असलेल्या जेडीयूविरोधातच शड्डू ठोकला आहे. भाजपविरोधात फक्त पाच ठिकाणी उमेदवार उभे केले असून आमच्यात ही हेल्दी फाईट असल्याचं पासवान यांनी म्हटलं आहे. जेडीयूचा प्रभाव कमी करुन आपला वरचष्मा सिद्ध करण्यासाठी भाजपनेच हा कुटील डाव खेळल्याची चर्चा बिहारच्या वातावरणात आहे.

या निवडणुकीच्या आधीच दलित मतदारांवर प्रभाव असणारे देशातील महत्वाचे नेते रामविलास पासवान यांचे निधन झाल्याने ही निवडणुक पहिल्यांदाच त्यांच्याविना होणार आहे. स्वतंत्रपणे लढणाऱ्या लोजपाला त्यांच्या मृत्यूनंतरच्या सहानुभूतीचा फायदा होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे.