चीनचा कुटील डाव; भारताशी चर्चा सुरु असतानाही सीमेवर युद्धाभ्यास

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

भारतीय सैन्यावर मानसिक दबाव आणण्याच्या दृष्टीने हा युद्धाभ्यास केला गेला असल्याचं म्हटलं जातंय.

पेईचिंग : पूर्व लडाखमध्ये वास्तविक निंयत्रण रेषेवर भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून हा तणाव वाढतच चालला आहे. सीमेवरील हे वातावरण निवळावे आणि तणाव कमी व्हावा यादृष्टीने लष्करी पातळीवर अनेत चर्चांच्या बैठका उभय देशांमध्ये घडून आल्या आहेत. मात्र, अद्याप त्यावर तोडगा निघाला नाहीये. अशातच, चीनची सेना पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय सीमेवर युद्धाभ्यास केला आहे. याबाबतची माहिती चीनच्या सरकारी वृत्त संस्था ग्लोबल टाईम्सने आपल्या ट्विटर अकांऊटवरुन दिलं आहे. 

हेही वाचा - पॅरिसमध्ये शिक्षकाच्या शिरच्छेद प्रकरणी नऊ जणांना अटक

भारतीय सैन्यावर मानसिक दबाव आणण्याच्या दृष्टीने हा युद्धाभ्यास केला गेला असल्याचं म्हटलं जातंय. तणावाच्या परिस्थितीत भारतीय सैन्याचे मनोबल कमी करण्याचा चीनचा हा कुटील डाव आहे. ग्लोबल टाईम्सने म्हटलंय की, पीपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट थिएटर कमांडने हिमालयात 4700 मीटर उंचीवर अलिकडेच लाईव्ह फायर एक्सरसाईज केले. यातील 90% टक्के युद्ध सामग्री आणि शस्त्रास्त्रे ही नवीन असून पहिल्यांदाच कार्यान्वित करण्यात आली. या ट्विटमध्ये या युद्धाभ्यासाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या अवघ्या एका मिनिटाच्या व्हिडीओमध्ये दिसून येतंय की चीनचे सैन्य युद्धासंबंधीची संपूर्ण तयारी करत आहे. आपली ड्रोन विमाने, आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांद्वारे स्वत:ला सुसज्ज बनवत आहे. 

चीनच्या सेनेने गाईडेड मिसाईलच्या हल्ल्याचेही प्रात्यक्षिक केले आहे. या अभ्यासादरम्यान चीनच्या सेनेने तोफादेखील डागल्या आहेत. सैनिकांच्या खाद्यांवर ठेवून डागल्या जाणाऱ्या मिसाईलचे प्रात्यक्षिक या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. चीनने हा दावा केलाय की या प्रात्यक्षिकातील 90 टक्के उपकरणे ही एकदम नवीन आहेत. आणि त्यांचा वापर पहिल्यांदाच या प्रात्यक्षिकांत करण्यात येतोय. भारत-चीन सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या चर्चेत दबाव बनवण्यासाठी हा व्हिडीओ चीनने जाहिर केला असल्याचं म्हटलं जातंय. 

हेही वाचा - New Zealand:जॅसिंडा अर्डर्न यांच्या लेबर पार्टीचा निवडणुकीत मोठा विजय

भारत आणि चीनच्या दरम्यान सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी अनेक बैठका झाल्या आहेत. मात्र, अजूनही या बैठकांना यश आलेलं नाहीये. 12 ऑक्टोबर रोजी या चर्चेची सातवी फेरी झाली होती. मात्र त्या बैठकीत देखील काही ठोस हाती लागलं नाहीये. लष्करी पातळीवर झालेल्या या सगळ्या बैठका अद्याप यशस्वी झालेल्या नाहीयेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PLA china held live-fire exercises in the Himalaya news by global times