Bihar Election : नितीश कुमार, सुशील मोदींना समर्थन नसेल; चिराग यांनी केलं स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

मात्र, आम्ही मोदींना केंद्रात पाठिंबा देऊ, असंही त्यांनी म्हटलंय. 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अत्यंत चुरशीचा ठरला आहे. नितीश कुमार यांच्याविरोधात राजदच्या तेजस्वी यादव यांनी तर लोजपाच्या चिराग पासवान यांनी मोठ्या प्रमाणावर रान उठवलं होतं. नितीश कुमारांशी आपले मतभेद स्पष्ट करत लोकजनशक्ती पार्टीने या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात एनडीएशी फारकत तर केंद्रात मोदींना समर्थन असं पासवान यांचा पवित्रा राहिला होता. मात्र, स्वतंत्रपणे निवडणूक लढवून नितीश कुमार यांना विरोध करण्याचा फार फायदा पासवान यांना झालेला दिसत नाहीये. अवघ्या एका जागेवर लोजपाचा उमेदवार निवडून आला आहे. 

याबाबत त्यांनी म्हटलंय की, मी आनंदी आहे की बिहारने लोजपावर प्रेम केलं आहे. जवळपास 25 लाख मतदारांनी 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट'वर विश्वास ठेवला आहे. आम्ही एकट्याने लढताना 6 टक्के मते मिळवली आहेत.  आम्हाला पिछलग्गू पार्टी म्हणून हिणवलं गेलं. मात्र, आम्ही धैर्य दाखवलं आहे, असं चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. त्यांनी पुढे म्हटलंय की, आमचा नितीश कुमार आणि सुशील मोदी यांना कधीच पाठिंबा नसेल. जर नितीश कुमार बिहार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार असतील तर राज्यपातळीवर माझा भाजपाला पाठिंबा नसेल. आम्ही मोदींना केंद्रात पाठिंबा देऊ, असंही त्यांनी म्हटलंय. 

हेही वाचा - Bihar Election : 'नो कन्फ्यूजन', नितीशकुमारच असतील मुख्यमंत्री; मोदींचं स्पष्टीकरण

नितीश कुमार यांची मते खाण्यासाठी भाजपनेच चिराग पासवान यांना या प्रकारे स्वतंत्र लढण्यास सांगितले होते, असं बोललं जात होतं. या प्रकारच्या कुटील डावांनी जेडीयूच्या जागा घटवण्याचा भाजपचा डाव असल्याचं बोललं जात होतं. आलेल्या निकालावरुन एनडीएमध्ये सध्या भाजपला 74 जागा तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला 43 जागा मिळाल्या आहेत. सध्या एनडीएमध्ये भाजप हाच मोठा भाऊ ठरला आहे. 

हेही वाचा - Bihar Election : अटीतटीचा सामना; जेडीयूकडून अवघ्या 12 मतांनी हारला राजदचा उमेदवार

लोकजनशक्ती पार्टीचा एकाच जागेवर उमेदवार निवडून आला आहे. त्यांनी बेगुसराय येथील मटिहानी मतदारसंघात विजय मिळाला आहे. ज्या ठिकाणी लोजपाचे उमेदवार राजकुमार सिंह यांनी जदयूच्या बोगा सिंह यांचा पराभव केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LJP president Chirag Paswan said will not be support at the state level but continue supporting PM Modi at the centre