कर्जवसुलीसाठी अधिकाऱ्यांचीच 'गांधीगिरी'

उज्ज्वलकुमार
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

पाटणा - कर्जवसुलीसाठी बॅंका अनेक उपाय अवलंबतात; पण भगवान बुद्धांच्या बिहारमधील एका बॅंकेने त्यासाठी थेट गांधीजींचा आधार घेतला आहे. ऋणकोच्या घरी "बाउन्सर' पाठविण्याऐवजी बॅंक अधिकारीच गेले आणि कर्जवसुलीसाठी धरणे धरले. बॅंक अधिकाऱ्यांची ही "गांधीगिरी' राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

पाटणा - कर्जवसुलीसाठी बॅंका अनेक उपाय अवलंबतात; पण भगवान बुद्धांच्या बिहारमधील एका बॅंकेने त्यासाठी थेट गांधीजींचा आधार घेतला आहे. ऋणकोच्या घरी "बाउन्सर' पाठविण्याऐवजी बॅंक अधिकारीच गेले आणि कर्जवसुलीसाठी धरणे धरले. बॅंक अधिकाऱ्यांची ही "गांधीगिरी' राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

कर्जवसुली हा कायमच डोकेदुखीचा विषय मानला जातो. अधिकाऱ्यांच्या या अफलातून उपायामुळे बॅंकेचा किती फायदा होईल हे सांगता येत नाही; पण सध्या तरी हा उपाय लागू पडतो की नाही, याची उत्सुकता आहे. मध्य बिहार ग्रामीण बॅंकेच्या गया शाखेतील अधिकाऱ्यांनी हा उपाय अमलात आणला. ए. पी. कॉलनीत बॅंकेची ही शाखा आहे. या शाखेच्या व्यवस्थापकासह कर्जवसुली अधिकाऱ्यापर्यंतच्या हुद्द्याचे सर्व अधिकारी टिल्हा महावीरस्थान या भागातील राजेशकुमार या ऋणकोच्या दारात धरणे धरून बसले. हे धरणे शांततेत झाले. राजेशकुमारने कर्जाची परतफेड करावी, एवढीच मागणी अधिकारी सौम्य भाषेत करत होते.

प्रधानमंत्री रोजगार योजनेंतर्गत राजेशकुमारने या बॅंकेकडून 2010 मध्ये कर्ज घेतले होते. सध्या त्याच्याकडे सात लाख 35 हजार रुपयांची थकबाकी आहे. कर्जवसुलीसाठी बॅंकेने पाठविलेली नोटीस आणि नंतर कायदेशीर नोटिशीलाही त्याने दाद न दिल्यामुळे ही "गांधीगिरी' करावी लागल्याचे बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आपण कारखान्यासाठी हे कर्ज घेतले होते; पण कारखाना न चालल्यामुळे आपले दिवाळे निघाल्याचा राजेशकुमारच्या भावाचा दावा आहे.

बिहार ग्रामीण बॅंकेच्या गया शाखेचे व्यवस्थापक राजेशकुमार यांच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री रोजगार योजनेंतर्गत 151 जणांनी कर्ज घेतले होते. त्यातील 117 जणांकडून काही ना काही उपाय योजून कर्जाची वसुली करण्यात आली. उर्वरित 34 जणांकडे तीन कोटी रुपयांची थकबाकी आहे. या सगळ्यांना कायदेशीर नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप त्यांनी कर्ज परत केलेले नाही.

Web Title: loan recovery by bank officer