'राफेल'वरून सरकार अधिवेशनात पहिल्याच दिवशी धारेवर

वृत्तसंस्था
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पूर्णवेळ शेवटच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज (ता. 12) राफेल करारावरून विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पूर्णवेळ शेवटच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज (ता. 12) राफेल करारावरून विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

लोकसभेत काँग्रेस, शिवसेना आणि अण्णा द्रमुकच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज आजच्या दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे. तिन्ही पक्षांच्या सदस्यानी राफेल करार, राम मंदिर आणि कावेरी नदीचा प्रश्न सभागृहात चांगलाच लावून धरला होता.

पुढील कामकाज जेव्हा दुपारनंतर चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी तिन्ही पक्षाच्या खासदारांनी सरकारविरोधात घोषणा द्यायला सुरवात केली. यावेळी काँग्रेस पक्षाकडून राफेल कराराची चौकशी करण्यासंदर्भात जेपीसी चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तर शिवसेनेने राममंदिराबाबत अध्यादेश काढण्याची मागणी सभागृहात लावून धरली. त्याचबरोबर, एआयडीएमकेच्या खासदारांनी कावेरी नदीचा मुद्दा उचलून धरला. यावेळी तेलगू देसम पक्षाचे खासदारही विशाखापट्टणमला रेल्वे झोन करण्याच्या मुद्यावरून आक्रमक झालेले पहायला मिळाले. या गोंधळानंतर सभापतींनी सभागृहाचे आजते कामकाज तहकूब केले.

दरम्यान, सभागृहाच्या वतीने सभापतींनी मेरी कोमचे अभिनंदन केले. तिने सहाव्यांदा जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे. यावेळी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे सभागृहात उपस्थित होते.

Web Title: Lok Sabha adjourned for the day as Congress, Shiv Sena, TDP, AIADMK members protest