Loksabha 2019 : महाराष्ट्र एकिकरण समिती दीडशेवर उमेदवार बेळगावातून उभे करणार ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मार्च 2019

बेळगाव - भू-संपादन आणि शेती पिकांना हमी भाव आदी मागण्यांसाठी तामिळनाडूतील १११ शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढविणार आहेत. याच पद्धतीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव लोकसभा निवडणुकीत दीडशेवर उमेदवार उभे करण्याची शक्‍यता आहे. सीमाप्रश्‍नाच्या लढ्यात हे महत्त्वाचे पाऊल असणार आहे. 

बेळगाव - भू-संपादन आणि शेती पिकांना हमी भाव आदी मागण्यांसाठी तामिळनाडूतील १११ शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढविणार आहेत. याच पद्धतीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव लोकसभा निवडणुकीत दीडशेवर उमेदवार उभे करण्याची शक्‍यता आहे. सीमाप्रश्‍नाच्या लढ्यात हे महत्त्वाचे पाऊल असणार आहे. 

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब होईल. बेळगाव महापालिकेच्या ५८ प्रभागांतून प्रत्येकी एक, तालुका व जिल्हा पंचायत मतदारसंघातून आणि प्रस्तावित रिंगरोड जाणाऱ्या ३० गावांतून प्रत्येकी एक उमेदवार देण्याचा मानस आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी मोदींच्या विरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. तशाच प्रकारे सीमाभागातूनही विविध समस्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी बेळगाव लोकसभा मतदारसंघात दीडशेहून अधिक जणांचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सीमाप्रश्‍न आणि शेतकऱ्यांची समस्या अशी सांगड घालत लोकसभा निवडणूक लढविण्याचा म. ए. समितीचा 
विचार आहे.

२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहर म. ए. समितीने नोटा या पर्यायाला मतदान करण्याचे आवाहन केले होते. तालुका समितीनेही असा निर्णय घेताना मतदानासाठी मोकळीकही दिली होती. पण, समितीचे दुसऱ्या फळीतील काही नेते 

राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला बांधले गेले. अनेक अर्थपूर्ण व्यवहार झाले. त्याचा फटका विधानसभा निवडणूक, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकीला बसला होता. त्यामुळे संघटनेला बाधा आली होती. पण, आता असा प्रकार टाळण्यासाठी आणि समितीची मते अबाधित राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत समिती नेत्यांत प्राथमिक चर्चा झाली आहे. पण, त्याला मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीतच मूर्त स्वरूप येणार आहे. त्यामुळे, समितीच्या बैठकीकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

मते राखण्याचाही प्रयत्न
लोकसभा निवडणुकीसाठी म. ए. समिती २००९ पूर्वीपर्यंत आपला उमेदवार देत होती. त्यामुळे मतांची विभागणी टाळण्यात येत होती. पण, गेल्या तीन निवडणुकांत समितीचा उमेदवार देण्यात आला नाही. त्याचा फायदा राष्ट्रीय पक्षांनी दीर्घकाळासाठी उठवला आहे. त्यामुळे आता आपली मते अबाधित ठेवण्यासाठी समितीला निर्णय घ्यावा लागेल.

Web Title: Loksabha 2019 Maharashtra Ekikaran Samit in Loksabha election