Loksabha 2019 : बेळगावात मतदानात घट; तर चिक्‍कोडीत वाढ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 एप्रिल 2019

एक नजर

  • कर्नाटकातील १४ जागांसाठी ६७.२१ टक्के मतदान
  • बेळगाव मतदारसंघातील मतदानाची टक्‍केवारी घसरली
  • मतदारसंघात ६६.५९ टक्के मतदान
  • चिक्कोडी मतदारसंघातील मतदान ७५.४१ टक्‍के

बेळगाव - देशभरात तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात कर्नाटकातील १४ जागांसाठी ६७.२१ टक्के मतदान झाले. मात्र, बेळगाव मतदारसंघातील मतदानाची टक्‍केवारी घसरली आहे. मतदारसंघात ६६.५९ टक्के मतदान झाले असून गतवेळेच्या तुलनेत ते दोन टक्‍क्‍यांनी कमी आहे. तर चिक्कोडी मतदारसंघातील मतदान अंशत: वाढून ७५.४१ टक्‍क्‍यांवर पोचले आहे. गतवेळेस तिथे ७४.५८ टक्के मतदान झाले होते. दोन्ही मतदारसंघांत चुरशीच्या लढती झाल्या असून सर्वांचे डोळे आता २३ मे कडे लागले आहेत.

लोकसभा निवडणुकीचा मागोवा घेतल्यास प्रत्येक निवडणुकीत मतदान तीन ते चार टक्‍क्‍यांनी वाढल्याचे दिसून येते. मात्र, यंदा त्यात फारशी वाढ झालेली नाही. यावरून मतदान जागृती कार्यक्रम, फेरी आणि विविध कार्यक्रम घेऊनही मतदारांनी फारसा प्रतिसाद दिला नसल्याचे स्पष्ट होते. २०१४ मध्ये बेळगावात ६८.५२ टक्के झाले होते. यावेळी ते ६६.५९ वर घसरले आहे.

विविध मतदारसंघांतील किरकोळ तांत्रिक बिघाड वगळता बेळगाव मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. एकूण १७,७१,८२९ पैकी ११,७९,९३० मतदारांनी आपला हक्क बजावला. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ७१.८१ टक्के मतदान झाले. याठिकाणी १,७३,१३७ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तर बेळगाव उत्तर मतदारसंघात सर्वात कमी ६१.७२ टक्के मतदान झाले. याठिकाणी १,४४, ७२४ मतदारांनी मतदान केले.

मात्र, चिक्‍कोडीतील मतदारांनी चुरशीने मतदान केल्याचे दिसून आले. तिथे एक टक्‍क्‍याने मतदानात वाढ झाली आहे. गतवेळेस चिक्‍कोडीत ७४.५८ टक्‍के मतदान झाले होते. यावेळेस ते ७५.४१ इतके झाले आहे. एकूण १६,०४,४८३ पैकी १२,१०,००५ मतदारांनी आपला हक्क बजावला. चिक्‍कोडी-सदलगा मतदारसंघात सर्वाधिक ८०.७९ टक्के मतदान झाले. याठिकाणी १,७४,५६६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तर कुडचीत सर्वात कमी ६९.६० टक्के मतदान झाले. याठिकाणी १,२५,९०९ मतदारांनी मतदान केले.

बेळगाव मतदारसंघातून सर्वाधिक ५७ उमेदवार रिंगणात आहेत. याठिकाणी म. ए. समितीने ४५ उमेदवार उभे केले होते. तरी मुख्य लढत भाजपचे विद्यमान खासदार सुरेश अंगडी व काँग्रेसचे नवखे उमेदवार डॉ. व्ही. एस. साधुन्नावर यांच्यात झाली. 
 

Web Title: Loksabha 2019 Voting in Belgaum and Chikodi