नेहरू, गांधी कुटुंबीयांवरील टिप्पणीने गदारोळ

congress, bjp, anurag thakur
congress, bjp, anurag thakur

नवी दिल्ली - अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी नेहरू, गांधी कुटुंबाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आज लोकसभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला. त्यांच्या माफीच्या मागणीसाठी आक्रमक काँग्रेस खासदारांनी कोरोना संकट काळातील सुरक्षित अंतराचा नियम झुगारून अध्यक्षांपुढील हौद्यात धाव घेतल्यामुळे तब्बल चार वेळा सभागृह तहकूब होऊन कामकाज अक्षरशः विस्कळीत झाले. 

लोकसभाध्यक्षांनी सदस्यांना कारवाई करण्याची तंबी देऊनही फरक पडला नाही. उलट, तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी पीठासीन अधिकाऱ्यांनाच कारवाईसाठी आव्हान दिल्यामुळे या गदारोळात भर पडली. त्यामुळे लोकसभेत आज काहीही कामकाज होऊ शकले नाही. अखेर, अनुराग ठाकूर यांनी कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असे म्हणत खेद व्यक्त केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. 

कर कायद्यातील सुधारणांशी संबंधित अध्यादेशाची जागा घेणाऱ्या विधेयकावरील चर्चेदरम्यान हा वाद झाला. हे विधेयक मांडण्यास काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने विरोध केला. त्यावर विधेयकातील तरतुदी करदात्यांना सवलत देणाऱ्या असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.  तर कोरोना संकट काळात सरकारने बनविलेल्या ‘पीएम केअर्स’ निधीवर टीकास्त्र सोडणाऱ्या विरोधकांना उत्तर देण्यासाठी अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना सांगितले. त्यांनी मात्र काँग्रेस नेतृत्वालाच लक्ष्य केल्याने गोंधळाला तोंड फुटले. 
 

‘पीएम केअर्स फंड’ सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट असून देशातील लोकांसाठी तो बनविण्यात आला आहे, असे सांगताना अनुराग ठाकूर यांनी, काँग्रेसने गांधी कुटुंबासाठी ट्रस्ट बनविले, असा आरोप केला. पंतप्रधानांच्या नॅशनल रिलिफ फंडमध्ये नेहरू आणि सोनिया गांधींना सदस्य बनविण्यात आले होते, असा दावा करताना यावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले. नेहरूंच्या काळात पीएम नॅशनल रिलिफ फंड बनविण्यात आला, त्याला पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून मान्यताही देण्यात आली नव्हती. तर ‘पीएम केअर्स फंडची कायदेशीर नोंदणी झाली असल्याचीही खोचक तुलना ठाकूर यांनी केली.

यावर बिथरलेल्या काँग्रेस खासदारांनी आक्षेप घेतल्यानंतर सभागृहात गोंधळ सुरू झाला. त्याआधी भाजपच्या बंगालमधील खासदार लॉकेट चटर्जी यांनी शून्य काळात केलेल्या विधानावर तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी प्रत्युत्तर देण्यासाठी बोलण्याची परवानगी मागत होते. लोकसभाध्यक्षांनी त्यांना परवानगी नाकारताना नव्या नियमानुसार जागेवर बसून बोलण्याची परवानगी असताना बोलण्यासाठी उभे राहून आणि मास्क काढून इतरांची सुरक्षा धोक्यात आणणाऱ्यांना सभागृहाबाहेर घालविले जाईल अशी तंबी दिली. यामुळे चिडलेल्या कल्याण बॅनर्जींनी पीठासीन अधिकाऱ्यांनाच आव्हान दिले. 

ठाकूर यांच्याकडून खेद
आधी मवाळपणे बसून असलेले काँग्रेस खासदारांना तृणमूल काँग्रेसच्या कल्याण बॅनर्जींची आक्रमकता पाहून नंतर जोर सुटला आणि अनुराग ठाकूर यांच्या माफीची मागणी करत हौद्यात धाव घेतली. तर या घटनाक्रमामुळे लोकसभाध्यक्षही चांगलेच नाराज झाल्याचे दिसून आले. पावणेचारच्या सुमारास अर्ध्यातासासाठी लोकसभाध्यक्षांनी कामकाज तहकूब केले. त्यानंतर सायंकाळी सहापर्यंत अर्ध्या अर्ध्यातासासाठी चार वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब होत राहिले. सायंकाळी सहाला पुन्हा सभागृह सुरू झाल्यानंतर अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी नमते घेत खेद व्यक्त केला. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. कुणी दुखावले असेल तर आपल्यालाही याचे दुःख आहे, अशा शब्दात विरोधकांना चुचकारताना यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र या वादात लोकसभेचे कामकाज होऊ शकले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com