arvind kejriwal and narendra modi
arvind kejriwal and narendra modisakal

Loksabha Election 2024 : राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत; दिल्लीत आज मतदान

दिल्लीतील सातही जागांवर प्रभुत्व ठेवण्याचे भाजपपुढे आव्हान.

नवी दिल्ली - दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्याचे भाजपचे ध्येय असले तरी दिल्लीतील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. भाजपपुढे सातही जागांवर प्रभुत्व कायम राखण्याचे आव्हान आहे तर आम आदमी पक्षापुढे (आप) दिल्लीत पहिला खासदार निवडून आणण्याचे आव्हान आहे.

राजधानी दिल्लीत उद्या, शनिवारी सातही मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. गेल्या २० वर्षांपासून ज्या पक्षाच्या येथे सातही जागा निवडून येतात, त्याच पक्षाकडे केंद्राची सत्ता कायम राहत असल्याची परंपरा आहे. २००४ व २००९ मध्ये काँग्रेसचे सातही खासदार निवडून आले होते. त्यावेळी काँग्रेसप्रणीत ‘यूपीए’चे सरकार केंद्रात होते.

तर २०१४ व २०१९ मध्ये दिल्लीतील सात जागांवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले तर केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ता आहे. यावेळी काँग्रेस व ‘आप’मध्ये आघाडी झाल्याने दिल्लीतील समीकरण बदलणार की, भाजपवर लोकांचा विश्वास कायम राहील, याचा निर्णय या मतदानातून समजणार आहे.

मुख्य मुद्दे बाजूला

‘दिल्लीला स्वायत्तता’ आणि ‘केंद्र सरकारने राज्य सरकारच्या अधिकारावर केलेले अतिक्रमण’ हे मुद्दे यावेळी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेमुळे बाजूला पडले. दोन्ही पक्षांकडून प्रचाराचा सारा भर केजरीवाल यांच्या अटकेवर राहिला आहे.

देशात पंतप्रधान मोदी विरुद्ध काँग्रेस नेते राहुल गांधी असा सामना असला तरी दिल्लीत मात्र पंतप्रधान मोदी विरुद्ध मुख्यमंत्री केजरीवाल या दोन नेत्यांमध्येच सामना असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांना निवडणूक जाहीर झाल्यानंतर अटक होणे आणि सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर सोडल्यामुळे हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे प्रचारातून दिसून आले.

केजरीवाल यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी केजरीवाल यांच्या स्वीय सचिवावर केलेल्या गैरवर्तणुकीच्या आरोपामुळे भाजप व ‘आप’चे नेते आणि कार्यकर्ते यांमध्ये थेट संघर्ष झाला आहे.

दिल्लीत ‘आप’ चार मतदारसंघात तर काँग्रेस तीन मतदारसंघात निवडणूक लढत आहे. काँग्रेसच्या वाट्याला चांदणी चौक, ईशान्य दिल्ली आणि वायव्य दिल्ली हे मतदारसंघ आले आहेत तर ‘आप’ नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, पूर्व दिल्ली व दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढत आहे.

लक्षवेधी लढती

नवी दिल्ली - या मतदारसंघात भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज भाजपच्या उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात ‘आप’चे नेते सोमनाथ भारती आहेत. केंद्रीय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांची उमेदवारी कापून बासुरी स्वराज यांच्यावर पक्षाने विश्वास टाकला आहे. उच्चशिक्षित मतदार असलेल्या या मतदारसंघात बासुरी यांची बाजू मजबूत असली तरी व्यवसायाने वकील असलेले सोमनाथ भारती गेल्या दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपसाठी ही लढत सोपी नक्कीच नाही.

ईशान्य दिल्ली : येथे भोजपुरी गायक मनोज तिवारी यांचा सामना विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांच्याशी होत आहे. दोन्ही मूळचे बिहारचे असल्याने या भागातील पूर्वांचली मतपेढीवर या दोन्ही नेत्यांची मदार आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीने होरपळलेला या भागातील मुस्लिम मतदारही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. याच मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी अधिक प्रचार केला आहे.

चांदणी चौक : ऐतिहासिक लाल किल्ला असलेला चांदणी चौक मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु डॉ. हर्षवर्धन यांनी या मतदारसंघात भाजपची मुळे घट्ट केली. परंतु यावेळी त्यांची उमेदवारी कापून व्यापारी प्रवीण खंडेलवाल यांना भाजपने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने ज्येष्ठ नेते जयप्रकाश अग्रवाल यांना उमेदवारी दिली. ही लढतही अटीतटीची होण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com