Loksabha Election 2024 : ‘विकासा’कडून ‘ध्रुवीकरणा’कडे

लोकसभा निवडणुकीच्या सर्वपक्षीय प्रचाराचा रथ भरकटला असून सामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे मागे पडत चालले आहेत.
Narendra Modi
Narendra Modiesakal

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सर्वपक्षीय प्रचाराचा रथ भरकटला असून सामान्यांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे मागे पडत चालले आहेत. ‘अब की बार चार सौ पार’ची घोषणा देणाऱ्या भाजपने ध्रुवीकरणाचा हुक्मी एक्का काढल्यानंतर विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठविली आहे.

काँग्रेस जनतेच्या ताब्यातील संपत्ती हिसकावून घेत ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना तिचे वाटप करणार असल्याचे विधान पंतप्रधानांनी राजस्थानातील सभेत केल्यानंतर विरोधक संतापले आहेत. आज अलिगडमधील सभेतही मोदी यांनी संपत्तीच्या वाटपाबाबत विरोधकांची विचारसरणी नक्षलवाद्यांसारखी असल्याचा घणाघात केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालविली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. पंतप्रधानांना आमचा जाहीरनामाच समजलेला नाही त्यामुळे आम्ही त्यांची भेट घेऊन त्यांना तो समजावून सांगणार आहोत. आम्ही त्यासाठी वेळ देखील मागितली आहे असे खर्गे यांनी नमूद केले. भाजपच्याविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे सतरा तक्रारी केल्या आहेत.

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल म्हणाले, ‘आमचे नेते आणि उमेदवार जाहीरनाम्याच्या प्रति पंतप्रधानांकडे पाठवतील. एक लाख लोकांची स्वाक्षरी असणारी एक याचिकाही आम्ही निवडणूक आयोगाकडे सादर करू.’ तत्पूर्वी राजस्थानमधील बन्सवाडा येथील सभेत बोलताना मोदी यांनी काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास सर्व संपत्ती मुस्लिमांकडे जाईल आणि हिंदू धर्मातील स्त्रियांचे मंगळसूत्रसुद्धा सुरक्षित राहणार नाही असे विधान केले होते.

काँग्रेसने या विधानाला तीव्र आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात आली आहे. ‘माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या भाषणाची मोडतोड करून पंतप्रधानांनी हा संदर्भ दिला. हे सगळे त्यांना रा. स्व. संघ आणि भाजपच्या प्रशिक्षणातून मिळाले आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात भाजपला जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे.

त्यातून सावरण्यासाठी पंतप्रधान हा खटाटोप करीत आहेत. संदर्भहीन वक्तव्ये करून ते मतदारांची दिशाभूल करीत आहे परंतु मतदार आता सुज्ञ झाले असून त्यांच्या भूलथापांना ते बळी पडणार नाहीत. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी काहीच न केल्याने काँग्रेसच्या लोकाभिमुख जाहीरनाम्याला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे,’ असे खर्गे म्हणाले.

पंतप्रधानांच्या विधानातून आचारसंहितेचा भंग झाला असून त्यावरील निवडणूक आयोगाचे मौन हा क्रूरपणा आहे. द्वेषमूलक भाषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचेही यातून उल्लंघन होते.

- सीताराम येचुरी, सरचिटणीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याबाबत सर्वसामान्य लोकांनी आवाज उठवावा आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहावे. आयोग देखील विरोधकांवर कारवाई करत भाजपला मात्र मोकळे रान उपलब्ध करून देत आहे.

- साकेत गोखले, तृणमूल काँग्रेसचे नेते

मोदींनी मुस्लिमांनाच घुसखोर ठरवून त्यांना अनेक मुले असतात असे म्हटले आहे. साधारणपणे २००२ पासून ते आतापर्यंत मते मिळविण्यासाठी ते सातत्याने मुस्लिमांचा अवमान करत आहेत. सध्या आपल्याकडे देशाच्या संपत्तीवर पहिला हक्क हा गर्भश्रीमंतांचा आहे. देशातील एक टक्का लोकांकडे ४० टक्के संपत्ती आहे. सर्वसामान्य हिंदूंना मुस्लिमांची भीती दाखवून त्यांची संपत्ती ही इतरांना श्रीमंत करण्यासाठी वापरली जात आहे.

- असदुद्दीन ओवेसी, प्रमुख ‘एमआयएम’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com