Narendra Modi : आघाडीत आतापासूनच ‘तुपा’वरून भांडणे; पंतप्रधान मोदींची टीका

‘पुढील पाच वर्षांत पाच जणांना पंतप्रधानपदावर संधी देण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये चर्चा आहे.
Narendra Modi
Narendra ModiSakal

महेंद्रगड (हरियाना) - ‘पुढील पाच वर्षांत पाच जणांना पंतप्रधानपदावर संधी देण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये चर्चा आहे. हे म्हणजे, गाईने अद्याप दूधही दिलेले नाही आणि तरीही तुपावरून भांडण सुरू, अशी स्थिती आहे,’ अशी तिरकस टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर केली. ही निवडणूक केवळ पंतप्रधान निवडण्याची नाही, तर देशाचे भवितव्य ठरविण्याची आहे, असे सांगत भाजपला मतदान करण्याचे आवाहन मोदी यांनी जनतेला केले.

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचा प्रचार आज संपला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मोदी यांनी हरियानातील महेंद्रगड येथे सभा घेतली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आणि ‘जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकणार नाही,’ अशी ग्वाही दिली.

मोदी म्हणाले, ‘एका बाजूला तुम्ही कामाचा अनुभव घेतलेला तुमचा ‘सेवक’ मोदी आहे, तर दुसऱ्या बाजूला कोण आहे कोणालाच माहिती नाही. इंडिया आघाडी ही अत्यंत जातीयवादी आणि घराणेशाही जपणारी आहे. काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी कधीही अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी परवानगी दिली नाही. सत्ता आल्यास दर वर्षी एका घटक पक्षाला पंतप्रधानपदावर संधी देण्याबाबत इंडिया आघाडीमध्ये चर्चा आहे.

त्यांची ही चर्चा म्हणजे, गाईने अद्याप दूधच दिलेले नाही आणि त्यापासून तयार होणाऱ्या तुपावरून भांडणे सुरू, असा प्रकार आहे. ही निवडणूक केवळ पंतप्रधान निवडण्यासाठी नाही, तर देशाचे भवितव्य ठरविण्यासाठीची आहे.’ हरियानातील दहा मतदारसंघांमध्ये २५ मे रोजी मतदान होणार आहे.

‘हरियानाचे माझ्यावर प्रेम’

नव्वदच्या दशकात भाजपचा कार्यकर्ता म्हणून हरियानामध्ये काम केले असल्याची आठवण पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले, ‘हरियानातील जनतेने माझ्यावर कायमच प्रेम केले आहे. माझे येथील जनतेशी दृढ नाते आहे.

हरियानाच्या विकासाचा रथ थांबणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो.’ काँग्रेसने केलेली पापे धुवून काढण्यासाठी मागील दहा वर्षांत भाजपने प्रचंड प्रयत्न केल्याचा दावाही मोदींनी केला. पराभव झाल्यानंतर कोणाला जबाबदार ठरवायचे, यासाठी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी विरोधकांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केल्याचा टोलाही मोदींनी हाणला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com