Loksabha Election : लोकसभा निवडणुकीत तिकीटे द्या! तृतीयपंथीयांची मागणी

लोकसभा निवडणुकीत अधिक प्रमाणात तिकिटे मिळावीत तसेच ‘ट्रान्सशक्ती’ म्हणून ओळख मिळावी, अशी मागणी तृतीयपंथी समुदायाने केली आहे.
bobby kinnar and mira parida
bobby kinnar and mira paridasakal

नवी दिल्ली - तृतीयपंथीयांमध्ये हक्क, अधिकारांबद्दल अलीकडे जागरूकता वाढत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अधिक प्रमाणात तिकिटे मिळावीत तसेच ‘ट्रान्सशक्ती’ म्हणून ओळख मिळावी, अशी मागणी तृतीयपंथी समुदायाने केली आहे.

देशातील सर्वाधिक वंचित समुदायापैकी एक असलेल्या तृतीयपंथी समुदायातील बहुतेकजण राजकारणापासून दूर राहणेच पसंत करतात. मीरा परिदा, बॉबी किन्नर आणि चंद्रमुखी मुवालासारखे तृतीयपंथी राजकारणी आपल्या समुदायाच्या हक्कासाठी लढत आहेत.

महिला सबलीकरणासाठी ‘नारीशक्ती’ सारखी संकल्पना वापरली जाते, त्याच धर्तीवर तृतीयपंथीयांना ओळख व सबलीकरणासाठी ‘ट्रान्सशक्ती’ संकल्पना वापरली जावी, अशी त्यांची मागणी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वच राजकीय पक्षांनी तृतीयपंथीयांना अधिकाधिक तिकिटे द्यावीत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही तृतीयपंथी व्यक्तींना दिवसा दूर ठेवून रात्री त्यांचे शोषण केले जात असल्याबद्दल बिजू जनता दलाच्या मीरा परिदा यांनी खंत व्यक्त केली. तृतीयपंथी असल्याने स्वत:च्या कुटुंबातील सदस्यांनी हिणवल्यानंतर वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षीच घर सोडलेल्या परिदा म्हणाल्या, की पक्षाने विश्वासाने जबाबदारी सोपविली तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविण्याची माझी तयारी आहे.

इतरांपेक्षा वेगळे असल्याची वागणूक कशी मिळाली, याच्या आठवणीही त्यांनी जागविल्या. मात्र, मूक राहून अन्याय सहन करण्यापेक्षा या परिस्थितीला आव्हान देण्याचे ठरविले. त्यातून सामाजिक काम सुरू करत राजकारणात अस्तित्व निर्माण केले, असेही त्यांनी सांगितले.

आपच्या दिल्ली महापालिकेच्या पहिल्या तृतीयपंथी नगरसेवक बॉबी किन्नर यांनी देशाच्या राजकारणात तृतीयपंथीयांचा समावेश व त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळण्याची गरज अधोरेखित केली. त्या म्हणाल्या, की तृतीयपंथी काहीही करू शकत नाहीत, असा लोकांचा पूर्वी समज होता. मात्र, हे खरे नव्हते. जी गोष्ट पुरुष किंवा महिला करू शकतात, ती आम्हीही करू शकतो. देशातील अनेक राजकारण्यांना आपला संघर्ष एखाद्या सन्मानचिन्हासारखा मिरवायला आवडतो, मात्र, कित्येक तृतीयपंथीयांच्या क्लेशदायक अनुभवाच्या तुलनेत तो फिकाच पडतो.

तेलंगणमध्ये २०१८ मध्ये विधानसभेतील निवडणूक लढविलेल्या चंद्रमुखी मुवालांनी अशीच भूमिका मांडली. त्या म्हणाल्या,‘‘देशाच्या राजकारणात तृतीयपंथीयाचा समावेश आणखी वाढविण्याची गरज आहे. तृतीयपंथी समुदायाने आपल्या समस्यांबद्दल आणखी मोकळेपणाने बोलायला हवे. आमच्या समस्या सारख्याच होत्या.

मी रस्त्यावरची भिकारी तसेच सेक्स वर्करही आहे. माझ्या कुटुंबाकडून मला झिडकारण्यात आले. वर्गमित्रांकडूनच माझी पिळवणूक, विनयभंग, बलात्कार केला गेला. अशा अनेक गोष्टी आमच्याबाबत घडतात. संसदेत आमच्या समस्या मांडण्याचे आश्वासन देणाऱ्यांना आमच्या वेदना कधीही समजत नाहीत. आमची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आम्हाला आरक्षण हवे.’’

देशातील तृतीयपंथी मतदार

४८,०४४ - २०२४

३९,६८३ - २०१९

व्यवस्थेत बदलाची गरज

तृतीयपंथी समुदायाच्या कार्यकर्त्या आणि काँग्रेस सदस्य अक्कर पद्मशाली यांनीही व्यवस्थेत बदल करण्याची गरज व्यक्त केली. लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्याक समुदायाच्या उन्नतीबाबत जगाकडून शिकायला हवे. तृतीयपंथीयांत मतदारांचे प्रमाण अतिशय कमी असून महिला आरक्षण विधेयकाच्या धर्तीवर तृतीयपंथीयांना आरक्षण मिळावे, असे त्या म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com