
नवी दिल्ली : सोमवारी लोकसभेत महागाईवर चर्चा झाली यादरम्यान अनेक मुद्दे उपस्थित झाले. यामध्ये लहान मुलीने पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्राचेही प्रकरण देखील समोर आले आहे. नुकतेच एका पहिलीतल्या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महागाईबद्दल तक्रार केली होती. दरम्यान यावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ही बाब लोकसभेत जोरदारपणे मांडली. (Loksabha Inflation Discussion)
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आता लहान मुलगी देखील महागाईने त्रस्त आहे. लोकसभेत चर्चेदरम्यान त्यांनी मुलीचे पत्र वाचून दाखवले. यानंतर यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचेही उत्तर आले आहे. सुरुवातीला त्यांनी सांगितले की, मुलीच्या पेन्सिलवर आतापर्यंत जीएसटीमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. त्याचवेळी, मुलीला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आशा आहेत, म्हणून हे पत्र लिहिण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्या मुलीच्या वडिलांनी मुलीचे पत्र पंतप्रधानांना पाठवले आहे. दरम्यान या पत्राच्या उत्तराची अजूनही त्यांना प्रतीक्षा आहे. पण, हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याची लोकसभेत देखील चर्चा झाली.
मुलीने पत्रात काय लिहिले?
उत्तर प्रदेशातील कन्नौजी येथील छिब्रामाऊ येथे राहणाऱ्या पाच वर्षीय कृती दुबे हिचे पत्र चांगलेच व्हायरल झाले आहे. पीएम मोदींना लिहिलेल्या या पत्रात खुशीने पंतप्रधानांना निरागस प्रश्न विचारले आहेत. माझे नाव कृती दुबे असे तिने लिहिले आहे. मी इयत्ता 1 मध्ये शिकते. मोदीजी, तुम्ही खूप महागाई केली, माझी पेन्सिल आणि खोडरबरही महाग केले आणि मॅगीची किंमत वाढवली. आता पेन्सिल मागितली म्हणून आई मारते, मी काय करू? मुले माझी पेन्सिल चोरतात, असेही तीने म्हटले आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
सुप्रिया सुळे यांनी खुशीने लिहिलेले पत्र सभागृहात वाचून दाखवले. यावेळी त्यांनी महागाईसाठी सरकारच्या धोरणांना जबाबदार धरले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आता महागाईचा परिणाम चिमुरडीच्या जीवनावर होत आहे. सुप्रिया सुळे यांनीही आपल्या भाषणात माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांची आठवण काढली. त्या म्हणाल्या की, सुषमाजी म्हणायच्या की सामान्य माणसाला आकडेवारीची भाषा समजत नाही. त्यांच्या खिशातून किती पैसे निघत आहेत हे त्यांनाच समजते.
अर्थमंत्र्यांनी दिलं उत्तर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत महागाईवर झालेल्या चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या वतीने मुलींच्या पेन्सिल आणि रबरच्या महागाईच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया दिली. यासंदर्भात त्या म्हणाल्या की, पेन्सिल आणि रबरवरील जीएसटीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. तसेच पुढे अन्नधान्यावरील जीएसटीबाबत निर्मला सीतारामन म्हणाल्या की, जीएसटी परिषदेच्या बैठकीत सर्व सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. जीएसटी कौन्सिलच्या निर्णयाचीच अंमलबजावणी झाली. तसेच, त्यांनी सांगितले की, त्या मुलीने पंतप्रधानांना पत्र लिहिले कारण तीला विश्वास आहे की ते कारवाई करतील. एक मुलगीसुद्धा आपल्या पंतप्रधानांवर विश्वास ठेवत आहे, तिचे पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि ते त्याला योग्य उत्तर देतील