

गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांचा वेग झपाट्यानं वाढला आहे. त्यातच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या देशाला चिंतेत टाकणारी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली आहे. देशातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये जवळपास ५० टक्के रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होते. अनेक उपाय योजनेनंतरही आकडेवारी वाढतच आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या शेजारी असणाऱ्या राज्यानेही चांगलीच धास्ती घेतल्याचं समोर आलं आहे. राज्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहून मध्य प्रदेश सरकारनं महाराष्ट्रालगतची सीमा बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्यातील सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
मध्य प्रदेश राज्यातील महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या बडवानी जिल्हा प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. बडवानीचे जिल्हाधिकारी शिवराज सिंह वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील बडवानी जिल्ह्याला लागून असलेल्या महाराष्ट्रात कोरोना संक्रमणाची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतेय. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमावर्ती ग्रामीण भागांना जोडणारे रस्ते तत्काळ बंद करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पोलिस आणि प्रशासनाच्या इतर विभागांच्या मदतीनं बॅरिकेडच्या आधारे महाराष्ट्राकडे येणारी आणि जाणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. बडवानी जिल्ह्याचा जवळपास १५० ते २०० किलोमीटरपर्यंत भाग महाराष्ट्राच्या सीमेला लागून आहे. त्यामुळेच प्रशासनानं हा निर्णय घेतला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग आणि खेतिया या दोन मार्गांवरून या राज्यांतील वाहतूक सुरू असली तर जिल्ह्याच्या १० वेगवेगळ्या ठिकाणांवर थर्मल स्क्रिनिंगची सोय करण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील दोन गावांनी बैठक घेऊन स्वेच्छेनं पाच दिवसांचा लॉकडाउन घेण्याचा निर्णयही घेतला आहे. येथील वाढती कोरोना रुग्णाांची संख्या पाहात दोन्ही गावांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोनाची साखळी तुटण्याचा एकमेव हेतू असल्याचं काही गावकऱ्यांनी सांगितलं. लॉकडाउनच्या कालावधीत फक्त सकाळी दोन तास किराणा दुकानं खुली राहतील. बडवानी जिल्ह्यात रविवारी ३५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार २९१ इतकी झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.