MP Exit Polls: मध्य प्रदेशमध्ये भाजप-काँग्रेसला किती जागा मिळतील?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 28 पैकी किमान 8 जागा जिंकाव्या लागतील. काँग्रेसकडे 87 आमदार आहेत आणि बहुमतासाठी त्यांना सर्व 28 जागांवर विजय मिळवावा लागेल. 

भोपाळ- मध्य प्रदेश विधानसभेच्या 28 जागांवर पोटनिवडणूक झाली. आता एक्झिट पोलचे कलही समोर आले आहेत. एक्झिट पोलमध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहेत. एक्सिस इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 17 तर काँग्रेसला 11 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर इंडिया टुडे आणि आज तकच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 16-18 जागा तर काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळू शकतात. मध्य प्रदेशमध्ये 28 जागांवर 3 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मतमोजणी 10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 

या 28 जागांवरील पोटनिवडणुकीनंतर भाजप आणि काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. गेल्या शुक्रवारी मध्य प्रदेश भाजपचे प्रभारी भूपेंद्र सिंह यांनी अपक्ष आमदारांबरोबर बैठक घेतली होती. मध्य प्रदेशमध्ये चार अपक्ष आमदार आहेत. पोटनिवडणुकीनंतर जर त्रिशंकू स्थिती झाली तर बसपाचे दोन आणि सपाच्या एका आमदाराची भूमिका महत्त्वाची असेल. 

हेही वाचा- Bihar Exit Poll - नितीश कुमार यांची धाकधूक वाढली; सत्तांतर होण्याची शक्यता

विशेष म्हणजे अपक्ष आमदार भाजप आणि काँग्रेस दोघांच्या संपर्कात आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते कमलनाथ यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपकडून पुन्हा एकदा आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रलोभन देऊन आपल्या गटात आमदारांना ओढले जात असल्याचे त्यांनी म्हटले. 

हेही वाचा- तेजस्वींची एक्झिट पोलमध्ये आघाडी मात्र लालूंची तब्येत बिघडली

भाजपकडे सध्या 107 आमदार आहेत. या 28 जागांचे निकाल हाती आल्यानंतर विधानसभा सदस्य संख्या 229 होईल. अशावेळी भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 28 पैकी किमान 8 जागा जिंकाव्या लागतील. काँग्रेसकडे 87 आमदार आहेत आणि बहुमतासाठी त्यांना सर्व 28 जागांवर विजय मिळवावा लागेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Madhya pradesh by election Exit Polls for 28 assembly seats Know Seat predictions Congress BJP