तेजस्वींची एक्झिट पोलमध्ये आघाडी मात्र लालूंची तब्येत बिघडली

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

शनिवारी लालू प्रसाद यांच्या जामीनावर सुनावणी देखील झाली. मात्र, त्यांच्या जामीनाला न्यायालयाने काही परवानगी दिली नाहीये.

एकीकडे बिहार विधानसभा निवडणुकीचा हाय व्होल्टेज ड्रामा आता अंतिम टप्प्यात आहे. जेडीयू-भाजप यांच्या एनडीए आघाडीला अगदी तगडे आव्हान देऊन राजद-काँग्रेसच्या महागठबंधनने विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पराभवाच्या छायेत ढकललं आहे. सगळे एक्झीट पोल्स तेजस्वी यादव यांच्याच बाजूने झुकलेले आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांचे वडील लालू प्रसाद यादव यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. 

न्यायालयाने जामीन फेटाळला
सध्या लालू प्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातील आरोपी म्हणून तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. मात्र, त्यांच्या वयोमानानुसार त्यांची प्रकृती नाजूक झाली असून सध्या तर ती बिघडली आहे. त्यांच्यावर रांची येथील रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. गेल्या शनिवारी लालू प्रसाद यांच्या जामीनावर सुनावणी देखील झाली. मात्र, त्यांच्या जामीनाला न्यायालयाने काही परवानगी दिली नाहीये. या साऱ्या पार्श्वभूमीवर त्यांना मानसिक तणाव आला असल्याचं बोललं जातंय तसेच त्यांना मधुमेहाचा असलेला आजार वाढत आहे. मधुमेहामुळे लालूंच्या क्रियेटनीनच्या पातळीत अचानकच वाढ झाल्यामुळे त्यांना त्रास होत आहे.

हेही वाचा - कधी सुविधा तरी कधी प्रक्रिया शुल्क; कोरोना काळातही बँकाकडून ग्राहकांची लूटच

मधुमेहाचा त्रास वाढला
याबाबतची सविस्तर माहिती त्यांच्यावर रिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार करणाऱ्या डॉ. उमेश प्रसाद यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लालू यांच्या शरीरातील क्रियेटनीनची पातळी अशीच जर वाढत राहिली तर त्यांना डायालिसीस करण्याची आवश्यकता भासू शकते. त्यांची तब्येत आणखीनच नाजूक होऊ शकते. याबाबतची सर्व माहिती न्यायालयात सादर करण्यात आली आहे. न्यायालयाने रिम्स हॉस्पिटलकडून लालूंच्या आरोग्याबाबतचा सविस्तर अहवाल मागवला होता. 

हेही वाचा - Corona Updates: दिलासादायक! जगातील सर्वात कमी मृत्यूदर भारतात

किडनीच्या कार्यक्षमतेत घट
लालू प्रसाद यादव यांना जेंव्हा उपचार करण्यासाठी रिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते तेंव्हा त्यांची किडनी 3 बी स्टेजला पोहोचली होती. आणि आता तर ती 4 बी स्टेजला पोहोचली आहे. सध्या त्यांची किडनी फक्त 25 टक्केच काम करत असल्याची माहिती आहे. त्यांच्या किडनीच्या कार्यक्षमतेत दिवसेंदिवस बिघाड होत असून गेल्या काही दिवसांमध्ये त्यांच्या किडनीच्या कार्यक्षमतेत 10 टक्क्यांनी घट झाली आहे. जर अशीच कार्यक्षमता कमी होत राहिली तर त्यांना डायालिसीस करण्याची गरज लागू शकते. रिम्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी असा अहवाल दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rjd chief lalu prasad yadav health deteriorates might go for dialysis