
Madhya Pradesh : सामूहिक विवाह सोहळ्यात वधूंना दिला मेकअप बॉक्स; उघडून पाहताच दिसले कंडोम
मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात सोमवारी एका सामूहिक विवाह सोहळ्यात नववधूंना दिलेल्या मेक-अप बॉक्समध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या सापडल्या. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या महिलांसाठीच्या योजनेअंतर्गत, थंडला इथं एका सामूहिक विवाह कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
यामध्ये २९६ जोडप्यांचा विवाह झाला. योजनेंतर्गत नवविवाहित जोडप्यांना कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांचं वाटप करण्यात आलं होतं. या योजनेचा भाग म्हणून वाटण्यात आलेल्या मेक अप बॉक्समध्ये ही पाकिटं आढळून आली आहेत.
वरिष्ठ जिल्हा अधिकारी भुरसिंग रावत यांनी राज्याच्या आरोग्य विभागाला जबाबदार धरलं आहे. ते म्हणाले की, कुटुंब नियोजनाशी संबंधित जनजागृती कार्यक्रमाचा भाग म्हणून आरोग्य अधिकार्यांनी कंडोम आणि गर्भनिरोधकांचं वाटप केलं असेल. (madhya Pradesh Marriage News)
"कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या वाटण्यासाठी आम्ही जबाबदार नाही. आरोग्य विभागाने हे साहित्य त्यांच्या कुटुंब नियोजन जागृती कार्यक्रमाचा भाग म्हणून वाटलं आहे. मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजनेंतर्गत, आम्ही ४९ हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करतो. आम्ही अन्न, पाणी आणि तंबू देण्यासाठी जबाबदार आहोत, ज्याची रक्कम ६,००० रुपये आहे. वाटल्या गेलेल्या पाकिटांमध्ये काय आहे, याबद्दल मला कल्पना नाही", असं रावत यांनी म्हटलं आहे.
मध्य प्रदेश सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांच्या लग्नासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी एप्रिल २००६ मध्ये मुख्यमंत्री कन्या विवाह/निकाह योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, सरकार वधूच्या कुटुंबाला ५५००० रुपये देते. गेल्या महिन्यात, दिंडोरीतील गडसराय भागात एका सामूहिक विवाह सोहळ्यात काही वधूंना प्रेग्नन्सी टेस्ट करायला लावल्याने ही योजना चर्चेत आली होती.