'गाड़ दूंगा, टांग दूंगा, लटका दूंगा...'; कमलनाथांचा शिवराज सरकारवर हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये विषारी दारु प्यायल्याने 12 लोकांचा मृत्यू झाला आहे.

भोपाळ : मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये विषारी दारु प्यायल्याने 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. मरणाऱ्यांमध्ये दोन वेग-वेगळ्या गावातील लोकांचा समावेश आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सुमावली पोलिस स्टेशन भागात पहावली गावात 3 आणि बागचीनी भागात मानपूर गावात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात आणखी दोघांची भर पडली आहे. विषारी दारू पिल्याने हे मृत्यू झाले आहेत. 6 लोक आजारी पडले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या या सर्व लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांना ग्वालियरमध्ये पाठवण्यात आलं आहे.  

हेही वाचा - विषारी दारू प्यायल्याने 10 लोकांचा मृत्यू; 7 जणांची प्रकृती चिंताजनक

या घटनेनंतर शिवराज सिंह सरकारवर काँग्रेसकडून निशाणा साधला जात आहे. माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी तर शिवराज सिंह चौहान यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यांनी असा प्रश्न केला आहे की, मुख्यमंत्री ज्या बाता मारत आहेत, त्या दिखाऊ आहेत. तर चंबलचे आयजी दारू पिल्यामुळे लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगत आहेत. 

माजी मुख्यमंत्र्यांनी मुरैना घटनेवर ट्विट करत म्हटलंय की, दारू माफियांचा कहर सुरुच आहे. उज्जैनमध्ये 16 लोकांचा जीव घेतल्यानंतर आता मुरैनामध्ये दारू माफियांनी पुन्हा एकदा 10 लोकांचा जीव घेतलाय. शिवराजजी, हे दारू माफिया कधीपर्यंत याचप्रकारे लोकांचा जीव घेत राहणार आहेत? सरकारने आजारी लोकांना तातडीने उपचार द्यावेत तसेच मृतांच्या कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत करावी.

कमलनाथ यांनी म्हटलं की, गाड दूंगा, टांग दूंगा, लटका दूंगा ही सगळी दिखाऊ आणि दिशाभूल करणारी वक्तव्ये आहेत. भाजपा सरकारमध्ये माफियांचा उत्साह वाढला आहे, सगळी कारवाई दिखाऊ आहे. मोठे माफिया अजूनही निर्भयपणे आपलं काम करत आहेत. ज्या माफियांना आम्ही नेस्तनाबूत केलं होतं ते आता भाजपा सरकारमध्ये परत मैदानात आलेत.

तर मुरैना घटनेवर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलं की विषारी दारू पिल्याने झालेले मृत्यू अत्यंत दुखद आणि क्लेषकारक आहेत. यासंबधित ठाण्याच्या प्रभारीला सस्पेंड केलं आहे. तपासासाठी एक वेगळं पथक देखील पाठवलं गेलं आहे. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या कुणालाही सोडलं जाणार नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: madhya pradesh morena poisonous liquor kamalnath big attack on shivraj singh