
मुंबईमध्ये इलेक्ट्रिक मीटरसक्ती नको, या मागणीसाठी शिवसेना माजी आमदार दगडू सकपाळ, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल दिग्ग्गीकर यांची शुक्रवारी भेट घेऊन निवेदन सादर केले.
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महसूल पंधरवाडा कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. 96 नवीन तलाठ्यांची नियुक्तीपत्र देऊन यावेळी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. मराठा बांधवांनी दगडूशेठ गणपती मंदिरात आरती केली
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे 91 टक्के काम पूर्ण झालेले असून संपूर्ण प्रकल्प सुरू होण्यास मे 2024ची मुदत देण्यात आली आहे. आता कंत्राटदाराने 181 दिवसाची अजून मुदत मागितली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
ठाणे येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत आव्हाडांच्या समर्थकांनी आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांकडून राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत रास्तारोको करण्यात आला.
७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा ०२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ३५०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये ८०० बसेसची वाढ करण्यात आली आहे.
केरळ मध्ये एनडीआरएफच्या जवानांकडून केरळच्या वायनाडमध्ये बचाव कार्यात अजुनही सुरू आहे. येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले होते. या घटनेतील मृतांची संख्या 167 वर पोहचली आहे.
केरळच्या वायनाडमधील भूस्खलनग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत मृतांचा आकडा 167 वर पोहोचला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. संभाजीराजे छत्रपती यांचे रक्त हिरवे आहे, अशा पद्धतीची भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसापूर्वी मांडली होती. इथे क्लिक करा
भारतीय नेमबाज स्वप्नील कुसाळे याने कांस्यपदक जिंकल्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीये. फडणवीस म्हणाले, "आपल्या महाराष्ट्रासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. मी स्वप्नीलचं अभिनंदन करतो, त्यानं राज्य आणि देशाला गौरव मिळवून दिला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही लवकरच त्यांच्या सन्मानार्थ घोषणा करतील..."
मुंबई : पॅरिस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केले आहे. कोल्हापूरच्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावले आहे.
प्रयागराज : मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी-शाही इदगाह मशीद वादावर आज ऐतिहासिक निकाल देण्यात आला. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मालकी हक्काबाबत दाखल केलेल्या दिवाणी दाव्यांचा विचार केला आणि मशिदीच्या बाजूचे अर्ज फेटाळले. न्यायमूर्ती मयंक कुमार जैन यांच्या न्यायालयाने ६ जून रोजी राखीव आदेश आज सुनावला.
सातारा : जिल्ह्यात तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचा एक संशयित रुग्ण परजिल्ह्यांतून दाखल झाला असून, त्या रुग्णावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपूर्वी काेरोनाने अनेक लोकांचा जीव घेतला. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. ही कोरोनाची लाट ओसरून जवळपास दोन वर्ष उलटून गेली, परंतु आता राज्यात काही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. चिपळूणमधील एक ५५ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्या व्यक्तीला कऱ्हाडमधील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कऱ्हाड : अल्पवयीस मुलीस पळवून नेवून तिच्या इच्छेविरोधात शरीर संबंध ठेवणाऱ्या एकास येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती के. एस. होरे यांनी २० वर्षे कारावास व दीड लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. रोहित रमेश थोरात असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पाटण तालुक्यातील एका गावात २०२२ मध्ये घटना घडली होती.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी सिडको आणि पनवेल महानगरपालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. 4 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
घाटकोपरच्या केव्हीके शाळेत मध्यान्ह भोजनात आढळले झुरळ. मुलांना दिल्या जाणाऱ्या दुपारच्या खिचडीमध्ये आढळले झुरळ. आठवीच्या विद्यार्थिनीने शिक्षकांच्या लक्षात आणून दिल्यावर खळबळ.
अमित ठाकरेंचा ताफा समृद्धी महामार्गावरून मालेगाव येथून अकोल्याकडे येताना ताफ्यातील गाड्या एकमेकांवर आदळल्या. समृद्धी महामार्गावर खाली उतरल्यानंतर अकोल्याकडे येतांना मनसे नेते अमित ठाकरेंच्या पातुरजवळील भंडारज फाट्याजवळची घटना. सुदैवाने कुणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. अमित ठाकरेंचा ताफा अकोला येथे पोहोचला. थोड्याच वेळात मृत मनसैनिक जय मालोकार यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावाकडे निघणार.
पुण्यातील भवानी पेठेत असलेल्या सोसायटीमधून १४ लाखांचा गुटखा जप्त पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट १ ने ही कारवाई केली, या प्रकरणी २ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कामरान मुर्तूजा खान आणि अमन महम्मद इस्लामुद्दीन अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मध्यवर्ती भाग म्हणून ओळख असलेल्या भवानी पेटीत एका सोसायटीमध्ये बेकायदा गुटख्याचा साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात. सावंतवाडी आणि दोडामार्ग क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण जास्त. गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 54.6 मिलिमीटर पावसाची नोंद. तेरेखोल नदी नदीकिनारी असलेल्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा.
हवाई दलासह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर एजन्सीकडून वायनाडमध्ये बचाव आणि मदत कार्य सुरु. IAF C-17 विमानानं वैद्यकीय मदत आणि बचाव कार्यासाठी इतर आवश्यक उपकरणांसह 53 मेट्रिक टन आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे
आज दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सात वाजता धोम धरणाची पाणी पातळी 745.15 मी. असून एकूण पाणीसाठा 11.49 अ.घ.फु. , 85.11% झाला आहे. धोम धरणाचे पाणलोट क्षेत्रामधील पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात येवा सुरू आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दुपारी 12.00 वाजता सांडव्यावरून कृष्णा नदीपात्रात सोडलेला विसर्ग 3364 क्युसेक वरून 4300 क्युसेक करण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण व येव्यानुसार त्यामध्ये कपात अथवा वाढ करणेत येईल. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे.
अकोल्यातील राडा प्रकरणात आमदार अमोल मिटकरी अकोला पोलिसांवर प्रचंड नाराज. गुन्हा दाखल झालेल्या 13 पैकी 3 आरोपींना जामीन. चार आरोपींना आज घेतलं ताब्यात. अमोल मिटकरी जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चनसिंग यांच्या भेटीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल. मिटकरींनी मनसे कार्यकर्त्यांचा आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा केला होता आरोप. आरोपींना पळून जाण्यासाठी काही पोलीस अधिकार्यांनी मदत केल्याचा केला होता आरोप.
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या दिर्घायुष्यासाठी आज माळशिरस तालुक्यातील मराठा समाजाच्या वतीने वेळापूर येथील प्रसिद्ध महादेव मंदिरात दुग्धाअभिषेक केला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा ही दिल्या. मनोज जरांगे पाटील यांचा आज वाढ आहे. या निमित्ताने त्यांना दिर्घारोग्य लाभावे असे साकडे घातले
नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने धरणाने तळ गाठला असून सध्या गिरणा धरणात रेवळ १५.२२ टक्के एवढा पाणी साठा शिल्लक राहिला आहे.मागील वर्षीच्या जुलै अखेर धरणात ३१.८८ टक्के जलसाठा होता मात्र यंदा तो निम्म्या पेक्षा कमी असल्याने नाशिकच्या मालेगाव सह खानदेश मधिल नागरीकांची चिंता वाढली आहे.या धरणावर अनेक पाणी योजना अवलंबून असल्याने चिंतेत वाढ झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याध्ये आज काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. मागच्या आठवड्यात केवळ रिमझिम पाऊस असल्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती. आज काही ठिकाणी पाऊस झाला. मात्र अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत मराठवाडा आहे. पावसा अभावी धरण प्रकल्प अजूनही कोरडे टाक असल्यामुळे मराठवाड्याची चिंता अजून मिटली नाही.
अनुसूचित जाती आणि जमातीतील उपवर्गीकरणास सुप्रीम कोर्टाची मान्यता. सुप्रीम कोर्टाच्या 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निकाल दिला आहे.
- या निर्णयाने एससी-एसटी आरक्षणामध्ये राज्यांना उप-वर्गीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे
- एससी-एसटी आरक्षणामध्ये राज्यांना उप-वर्गीकरण करण्याची परवानगी देता येईल का ? यावर सर्वोच्च न्यायालयाचे 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली होती, फेब्रुवारी महिन्यात कोर्टाने हा निकाल राखून ठेवला होता तो निकाल आज कोर्टाने दिला.
- भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती बीआर गवई, विक्रम नाथ, बेला एम त्रिवेदी, पंकज मिथल, मनोज मिश्रा आणि सतीश चंद्र शर्मा या न्यायाधीशांचा समावेश या पिठात होता.
- न्यायमूर्ती बेला त्रिवेदी वगळता बाकी सर्व न्यायमूर्तींच्या बहुमताने कोर्टाने हा निकाल दिला.
सद्यस्थितीत लोणंद ते फलटण एवढाच मार्ग पूर्ण झाला. पण त्यानंतरचा फलटण ते पंढरपूर हा जवळपास १०५ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही. प्रकल्पात राज्य सरकार देखील ५०% वाटा देणार आहे, केंद्र सरकारने लवकरच उरर्वरित निधीची तरतुद करुन रखडलेल्या रेल्वे मार्गाला लवकरात लवकर गती द्यावी अशी मागणी केली आहे.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर येण्याची शक्यता
- केंद्र सरकारच्या पश्चिम विभागीय परिषदेच्या २७ व्या बैठकीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता
- परिषदेत गुजरात, गोवा, महाराष्ट्र, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे अधिकारी राहणार उपस्थित
- या बैठकीला मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव उपस्थित राहणार
- महिला आणि बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांचा आणि बलात्काराच्या प्रकरणांचा तपास जलद गतीने व्हावा
- जलदगती विशेष न्यायालयांच्या योजनेची अंमलबजावणी
- वीज, उद्योग बँकिंग क्षेत्र या विविध विषयांवर चर्चा होणार
बिहार आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरजेडी, काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली. "आमच्या आघाडीचे सर्व नेते जे बिहारमधून निवडून आले आहेत ते येथे आहेत. आमची मागणी आहे की बिहारचा जातीचा 65 टक्के भाग घटनेच्या 9 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करावा," असे RJD खासदार मनोज झा म्हणाले.
अलिगडमध्ये ट्रक आणि इको कार यांच्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून पाच गंभीर जखमी झाले आहेत. अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी जखमींना जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असून घटनेचा तपास सुरू आहे.
सुनील तटकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर महायुतीत तणाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. कारण या दौऱ्यात तटकरे यांनी दिंडोरीतून आमदार नरहरी झिरवाळ यांची उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले यांनी नाराजी व्यक्त करत, "उमेदवारी जाहीर करण्याचा तटकरेंनी काय अधिकार?" असा सवाल उपस्थित केला आहे.
पूर्व विदर्भात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. गडचिरोली, चंद्रपूर गोंदिया येथे आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने इशारा दिला. वर्ध्याला उद्याही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात आलेल्या गँगस्टर आबू सालेमला काल रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात दुसऱ्या मोठ्या शहरात हलवण्यात आलं. रात्रीच्या अडीच वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून रेल्वेने आबू सालेमला सुरक्षिततेच्या कारणास्तव हलवण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचं मिशन "ताई, माई, अक्का" चालू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना महिला वोट बॅकवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर शिवसेना महिलांचे मेळावे घेणार आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे, आणि या योजनेसाठी आतापर्यंत १ कोटी ८० लाखाहून अधिक अर्ज शासनाकडे आले आहेत. योजनेचा प्रसार आणि प्रचार मोठ्या प्रमाणात करण्याच्या शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांना सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यात शिवसेनेचा पहिला महिला मेळावा सिल्लोडमध्ये उद्या होणार आहे. त्यानंतर प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर महिला मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना, या मेळाव्यांच्या माध्यमातून शिवसेना राज्यातील घराघरात पोहचण्याचा प्रयत्न करत आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३० रुपये दर न देणाऱ्या संघावर गुन्हे दाखल करा. आजपासून दूध डेअऱ्यांनी ३० रुपये दर देणे बंधनकारक असेल असे आदेश दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
राज्य सरकार प्रती लिटर दुधासाठी ५ रुपयांचे अनुदान देणार आहे. आजपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला ३५ रुपयांचा दर मिळणार आहे. दुधाची माहिती मिळावी यासाठी विशेष ॲप तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्यात.
मनोज जरांगे पाटील उद्या पुणे न्यायालयात उपस्थितीत राहणार आहेत. मनोज जरांगे यांच्या विरोधात पुणे न्यायलयाने वॉरंट जाहीर केलं होतं. नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी मनोज जरांगे आणि इतर दोन जणांच्या विरोधात पुणे कोर्टाने अटक वॉरंट जारी केले होते. वॉरंट इशू करू नये म्हणून दोन तारखेला हजर होऊ असं मनोज जरांगे यांच्या वकीलांकडून सांगण्यात आलं होतं.
मुंबईच्या रस्त्यांवर लवकरच घोडेस्वार पोलिसांची गस्त पाहायला मिळेल. घोडेस्वार पोलीस (mounted cops) पथकाला पुनर्जीवित करण्याच्या मुंबई पोलिसांच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी दिली आहे.
घोडेस्वार पथकासाठी ३८.४१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. मुंबई पोलीस लवकरच ३० घोडे घेणार आहे. गर्दीचे ठिकाणे, मोर्चे तसेच समुद्रकिनारे आणि पदपथांवर घोडेस्वार पथक गस्त घालणार आहे.
पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्ट निर्णय देणार आहे. सायंकाळी 4 वाजता न्यायमूर्ती देवेंद्रकुमार जांगला यासंदर्भात निकाल देतील. पूजा खेडकर यांनी व्यवस्थेसोबत फ्रॉड केला आहे. त्यामुळं तिला जामीन मिळू नये असा युक्तिवाद UPSC आणि पोलिसांच्या वतीने केला होता.
तर, पुजाने कुठलाही गैरव्यवहार केला नसून तिला दिलेल दिव्यांग प्रमाणपत्र AIMS च्या डॉक्टरांनी दिल्याचा दावा पूजा खेडकरच्या वकिलांनी केलाय. आमच्याकडून तपासाला पूर्ण सहकार्य होईल. त्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर करावा अशी विनंती पूजा खेडकरच्या वकिलांनी केलीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.