गोव्यात भाजपविरोधात मगो, काँग्रेस एकत्र?

गोव्यात भाजपविरोधात मगो, काँग्रेस एकत्र?

पणजी : गोव्यात कॉंग्रेस व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सध्याच्या राजकीय परिस्थितीत एकमेकाचे प्रतिस्पर्धी असले तरी भाजपविरोधात या दोन्ही पक्षांची हातमिळवणी झाली आहे. मांद्रेत कॉंग्रेसच्या उमेदवाराला तर शिरोड्यात मगोच्या उमेदवाराला या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अंतर्गत मदत करतील असे ठरवण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. 

गेला आठवडाभर याविषयी विविध पातळ्यांवर चर्चा सुरु होती. काल रात्री झालेल्या एका बैठकीत याला मूर्त स्वरुप देण्यात आले. यासाठी कॉंग्रेसमधील एका वजनदार नेत्याने पुढाकार घेतला. त्यानेच दोन्ही पक्षाच्या नेत्यांना या चर्चेसाठी एकत्र आणले. अखेरीस भाजपविरोधात एकेक मतदारसंघ वाटून घेत काम करण्यावर मतैक्‍य झाले आहे. मात्र पोटनिवडणूक जाहीर होईपर्यंत मतदारसंघ पातळीवर याचे काम सुरु करण्यात येऊ नये असेही दोन्ही पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ठरवले आहे. 

कॉंग्रेसच्या संपर्कात पाच आमदार असल्याच्या माहितीस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी यापूर्वीच दुजोरा दिला आहे. पोट निवडणुकांनंतर कॉंग्रेस सरकार स्थापन करेल असेही त्यांनी जाहीर केले आहे. या साऱ्यामागे ही समीकरणे असल्याचे एका माहितगार नेत्याने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. त्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार सत्ताधारी गटातील अन्य काही जण कॉंग्रेसच्या संपर्कात असून ते राजकारण कसे कुस बदलते यावर लक्ष ठेऊन आहेत. सध्याचे सरकार अस्थीर होते असे दिसले तर ते तत्काळ पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही याची तजवीज करत कॉंग्रेसमध्ये येतील असे या नेत्याचे म्हणणे आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे दसऱ्यापूर्वीही एकमत झाले होते. दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस त्यावेळी सरकार स्थापनेची तयारी करत होते. मात्र दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांच्या राजीनाम्यामुळे कॉंग्रेसचा राजकीय डाव विस्कटला गेला. आता तोच डाव नव्या पद्धतीने मांडला जात आहे. 

विजय, विश्‍वजितच्या मैत्रीमुळे 
आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे आणि कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी एकत्र येण्याकडे भाजपमधीलच काही जण साशंकतेने पाहत आहेत. राफेलसंदर्भात ध्वनीफीत चर्चेत आल्यानंतर भाजपमधील नेत्याने पक्षात बाहेरून आलेल्यांच्या समोर पक्षातील महत्वाच्या बाबींची चर्चा नको असा अलिखित आदेश जारी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सरकार अस्थीर झाले तर सावरण्यासाठी आम्ही एकत्र येऊ असे राणे व सरदेसाई यांनी राणे यांचा वेगळाच अर्थही भाजपचे काही नेते काढू लागले आहेत. तेही कॉंग्रेसच्या पथ्यावर पडेल असा कॉंग्रेसच्या नेत्यांचा होरा आहे. 

राहूल गांधीसोबत बैठक 
कॉंग्रेसने सरकार स्थापनेचा विषय गांभीर्याने घेतला आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांच्याशी एका सत्ताधाऱ्याची यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. मांडवीवरील तिसऱ्या पुलाच्या उद्‌घाटनाला ती व्यक्ती उपस्थित होती. तो कार्यक्रम आटोपल्यानंतर हॉटेल लीलामध्ये जाऊन त्याने गांधी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे सत्तांतर अटळ मानले जात आहे.

म्हापशातील बैठकीत पडसाद 
भाजपने लोकसभा निवडणूक तयारीसाठी म्हापशात घेतलेल्या बैठकीवेळी काही युवा नेत्यांनी केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याविरोधात जाहीर वक्तव्य केल्याची दखलही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे पक्षाला पोट निवडणुकीत फटका बसू शकेल असेही काही नेत्यांना वाटते. त्यामुळे त्यासाठी वेगळी व्यूहरचना आकाराला आणण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com