भाजपला प्रतीक्षा ‘करेक्ट’ वेळेची

राज्यातील घडामोडींमध्ये हस्तक्षेप नाही, पडद्यामागून मात्र हालचाली
Maharashtra politics BJP wating for Correct time to Establish government  Amit Shah sanjay raut mahavikas aghadi eknath shinde
Maharashtra politics BJP wating for Correct time to Establish government Amit Shah sanjay raut mahavikas aghadi eknath shinde sakal

नवी दिल्ली : ‘‘एखादा रूग्ण व्हेंटिलेटरवर असतो, तेव्हा तो जास्त काळ ‘टिकणे’ अशक्यच असते. पण अशा वेळी ‘अंतिम’ परिणाम दिसेपर्यंत शांत बसणे हेच अपेक्षित असते. महाराष्ट्रातील आघाडी सरकारबाबतही भाजपची तीच भूमिका आहे,’’ ही बोलकी प्रतिक्रिया भाजपच्या एका केंद्रीय नेत्याने राज्यातील राजकीय अस्थिरतेवर व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील घडामोडींबाबत भाजप नेत्यांकडून विधाने होणार नाहीत, याची खबरदारी दिल्लीतून घेतली जात आहे. या राजकीय नाट्याची सूत्रेही गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयातून हलविली जात असून विधानसभेतील शक्तीपरीक्षणाद्वारे महाविकास आघाडी सरकार पाडणे याकडेच भाजपचा कल दिसतो, असे समजते.

शिवसेना खासदारांशी संपर्क

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या आमदारांची संख्या वाढत जाताना ती ‘निर्णायक'' टप्प्यापर्यंत पोहोचत नाही तोवर भाजप यात प्रत्यक्ष उडी घेणार नाही हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडीतील अस्थिरता सुरू झाल्यापासून गेले तीन दिवस भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपला त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे चित्र दिल्लीत निर्माण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीनंतरच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना सुरतला रातोरात नेण्याबाबतची योजना प्रत्यक्ष अमलात आणण्यात आल्याची शक्यता असली तरी पंतप्रधान, अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यावर एका अक्षराचीही जाहीर प्रतिक्रिया आलेली नाही. केवळ आमदारच नव्हे तर भाजप नेतृत्वाकडून शिवसेनेच्या खासदारांशीही संपर्क साधण्यात आलेला आहे.

शहांच्या कार्यालयातून समन्वय?

शिवसेनेत आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर यांच्या हस्तक्षेपाबाबत व संजय राऊत यांच्या वर्चस्वाबाबत शिवसेना खासदार नाराज असल्याचा आरोप आहे. भाजपने २०१९ पासून ही अस्थिरता हेरली आहे. मात्र त्यावर फुंकर घालण्याची योग्य वेळ आता आल्याचे भाजपच्या हालचाली सांगतात. पक्षसूत्रांच्या मते, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या शिवसेना आमदारांशी संपर्क साधणे, मूळचे जळगावचे असलेले गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी ‘ॲक्टिव्ह’ मोडवर येणे, या आमदारांची गुवाहाटीत व्यवस्था ठेवणे, ही सारी सूत्रे दिल्लीतूनच हलविण्यात आली.

सावध प्रतिक्रिया

भाजप सूत्रांच्या मते, महाराष्ट्राबाबत भाजप नेतृत्व कमालीच्या सावधपणे पावले टाकत आहे. राजस्थानातील सचिन पायलट यांचे फसलेले बंड आणि महाराष्ट्रातील यापूर्वीचा पहाटेच्या शपथविधीचा अनुभव ताजा असल्याने भाजप नेतृत्व कोणताही धोका पत्करण्याच्या मूडमध्ये नाही. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी बोम्मई खटल्यात दिलेला निकाल पाहता राष्ट्रपती राजवट लावण्‍याचा तर विचारही भाजप नेतृत्व करू शकत नाही. शिंदे यांच्यामागे योग्य संख्याबळ जमा झाल्यावरच भाजप राज्यातील सत्तास्थापनेच्या खेळात ‘दृश्यमान'' होईल.

खासगी विमानाने देशमुखांना पाठविले

मुंबई : शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख काल गुवाहाटीहून परत आले. येथे नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले. ‘मी स्वतः आपली सुटका करून आलो,’ असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले होत. पण त्यांचा हा दावा खोटा असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाने केला आहे.

देशमुख यांचा दावा खोटा आहे, हे दाखवणारी काही छायाचित्रे आणि व्हिडिओ शिंदे गटाकडून व्हायरल करण्यात आली आहेत. ेशमुख यांचा गुवाहाटी ते नागपूर हा परतीचा प्रवास खासगी विमानाने झाला. एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांनी सन्मानाने त्यांना येथपर्यंत पोहोचविले. येथे अकोल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर त्यांना घ्यायला आले होते. येथून त्यांच्यासोबत मोटारीने ते अकोल्याला गेले. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर अकोल्यात पोहोचल्यावरही त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

‘‘मी रात्री १२ वाजता हॉटेलमधून बाहेर पडलो. रात्री ३ वाजेपर्यंत रस्त्यावर होतो. कोणते वाहन मिळते का ते बघत होतो. वाहने येत जात होती, पण एकाही वाहनचालकाने मला घेतले नाही. माझ्या मागावर १०० ते १५० पोलिस होते. त्यांनी जबरदस्तीने तेथून उचलून मला हॉस्पिटलमध्ये नेले,’’ असे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितले होते. मला हृदयविकाराचा झटका आलेला नव्हता. मी आजारी नव्हतो. मला बळजबरीने डाव्या दंडावर इंजेक्शन टोचण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com