महाराष्ट्र, पंजाबची कोरोनाची स्थिती चिंताजनक

Corona
Corona

नवी दिल्ली - महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड आणि गुजरात या पाच राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतो आहे. या पाचही राज्यांतील नव्याने बाधित रुग्णांचे प्रमाण ७७.४४ टक्के एवढे असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मागील चोवीस तासांमध्ये ४७ हजार २६२ रुग्णांची नोंद झाली. सहा राज्यांमधील नव्या केसेसचे प्रमाण ८१.६५ टक्के एवढे आहे. आठ राज्यांमधील एका आठवड्यामध्ये रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा (४.११ टक्के) अधिक आहेत. महाराष्ट्रात एका आठवड्यात रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण हे २०.५३ टक्के एवढे आहे, आहे असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

दुसरीकडे केंद्राने या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यावर भर दिला आहे. पाच कोटींपेक्षाही अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. आठही राज्यांमध्ये झालेल्या लसीकरणाचे एकत्रित प्रमाण हे साठ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कोरोनामुळे मरण पावणाऱ्या नागरिकांमधील  ८३.२७ टक्के  नागरिक हे या सहा राज्यांतील आहेत. महाराष्ट्रात ते दररोज १३२ असून त्यापाठोपाठ पंजाब (५३) आणि छत्तीसगड (२०) यांचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे मागील चोवीस तासांमध्ये बारा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे होणारे ८८ टक्के मृत्यू हे ४५ वर्षे आणि वरील वयोगटातील आहेत. या गटातील नागरिकांना अधिक संरक्षणाची गरज असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. या वयोगटातील रुग्ण दगावण्याचे प्रमाण हे २.८५ टक्के एवढे आहे. 

वाढीमागे अनेक कारणे
कोरोनाच्या विषाणूचे आतापर्यंत ७७१ प्रकार सापडले आहेत. दरम्यान काही राज्यांमध्ये म्युटेशनमुळे  कोरोना रुग्ण वाढत आहेत, असा दावा करणे योग्य होणार नाही, असे राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक एस.के. सिंग यांनी सांगितले. या वाढीमागे अनेक कारणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात नऊ जिल्हे चिंताजनक
कोरोनाचे तीन स्ट्रेन हे चिंताजनक आहेत. त्यामध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमधील स्ट्रेन्सचा समावेश आहे. महाराष्ट्रातील नऊ व कर्नाटकमधील एका जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक आहे. महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यांत रुग्ण वाढीचा वेग अधिक आहे. पंजाबमधील लुधियाना, पतियाळा आणि होशियारपूर या जिल्ह्यांत कोरोना वेगाने पसरतो आहे, असेही आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com