गोव्यात मगोला खिंडार, दोन आमदार भाजपमध्ये

Goa
Goa

पणजी : उत्तररात्री झालेल्या राजकीय घडामोडींत गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला खिंडार पडले आहे. मगोच्या तीन पैकी दोन अामदारांनी वेगळा गट स्थापन केला आणि त्यांनी नंतर भाजपमध्ये हा गट विलीन केला. याला प्रभारी सभापती मायकल लोबो यांनी मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात येण्याची शक्यता असून ११ पैकी नेमके कोणत्या मंत्र्याला वगळणार हे अद्याप मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले नाही. मात्र या फुटीर गटातील आमदार दीपक पाऊसकर यांनी आपण दुपारी १२ वाजता  मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले.

माजी मुख्यमंत्री स्व.  मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्चला निधन झाल्यानंतर गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेनंतरच्या राजकीय नाट्याचा पहिला अंक यामुळे आज पूर्ण झाला. २०१७ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ४० सदस्यसंख्या असलेल्या गोवा विधानसभेत भाजपचे १३, कॉंग्रेसचे १७, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तीन, गोवा फॉरवर्डचे तीन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक व तीन अपक्ष आमदार निवडून आले होते. भाजपने मगोचे तीन, गोवा फॉरवर्डचे तीन, तीन अपक्ष यांच्या मदतीने सरकार बनवले होते. त्याला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव यांनीही पाठींबा दिला होता. म्हणजे केवळ कॉंग्रेस सरकारविरोधात होती.

आमदारकीची शपथ घेताच कॉंग्रेसचे वाळपईतील तत्कालीन आमदार विश्वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि ते आरोग्यमंत्रीही झाले. नंतर भाजपच्या उमेदवारीवर ते निवडून आले.

या घडामोडीमुळे कॉंग्रेसची सदस्यसंख्या १६ तर भाजपची १४ झाली. त्यामुळे कॉंग्रेस ही सातत्याने सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा दावा करत राहिली. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये भाजपने कॉंग्रेसही पुन्हा खिंडार पाडले. कॉंग्रेसचे मांद्रेतील तत्कालीन आमदार दयानंद सोपटे व शिरोड्यातील तत्कालीन आमदार सुभाष शिरोडकर यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. आता या जागांवर २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक आहे. या दोघांच्या राजीनाम्यामुळे विधानसभेतील भाजप कॉंग्रेसचे पक्षीय बलाबल १४-१४ झाले. त्यानंतर आता फेब्रुवारीत माजी उपमुख्यमंत्री
व भाजपचे म्हापशातील आमदार अॅड फ्रांसिस डिसोझा यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यापाठोपाठ १७ मार्च रोजी मुख्यमंत्रीपदी असताना मनोहर पर्रीकर यांचेही कर्करोगाने निधन झाले. यामुळे विधानसभेत कॉंग्रेस १४ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष ठरला तर भाजपचे बळ १२ वर आले होते.

यामुळे भाजप आपले बळ तरी वाढवण्यासाठी काहीतरी करणार किंवा कॉंग्रेसचे बळ कमी करण्यासाठी तरी उपायायोजना करणार हे ठरून गेलेले होते. त्याला पूरक अशी स्थिती १८ मार्चला निर्माण झाली. भाजप आघाडी सरकारला पाठींबा दिलेल्या गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, जयेश साळगावकर आणि विनोद पालयेकर या तिघांही आमदारांना मंत्रिपदे मिळतात तर मगोचे सुदिन ढवळीकर, मनोहर आजगावकर आणि दीपक पाऊसकर यांना मंत्रिपदे का नाहीत असा प्रश्न मगोच्या नेत्यांना पडत होता. त्यांचे दीपक पाऊसकर हे मंत्रिपदी नव्हते. त्यामुळे सत्ता स्थापनेला पाठींब्याचे पत्र देण्यापूर्वी तीन मंत्रिपदे व तीन महामंडळांची अध्यक्षपदे मागण्याचे मगोच्या केंद्रीय समितीने ठरवले. प्रत्यक्षात भाजपचे नेते आणि सरकार स्थापनेसाठी घटक पक्षांशी वाटाघाटी करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत ही मागणी पोचलीच नाही आणि नव्या सरकारमध्येही पाऊसकर हे मंत्री झाले नाहीत.

यानंतर चिडलेले मगोचे सरचिटणीस लवू मामलेदार यांनी प्रभारी सभापती मायकल लोबो, राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा व मुख्य सचिव परीमल राय यांना पत्र लिहून केवळ मगोच्या सरचिटणीसांच्या सहीचाच पत्रव्यवहार वैध माना  असे कळवले. मगोचे अध्यक्ष हे दीपक हे उपमुख्यमंत्री सुदिन यांचे कनिष्ठ बंधू. त्यामुळे दीपक यांनी सही करून दिलेले पत्र अवैध ठरण्याची भीती निर्माण झाली होती. मगोने तातडीने केंद्रीय समितीची बैठक बोलावून सरचिटणीस मामलेदार यांची सहा वर्षांसाठी पक्षातून शनिवारी २३ रोजी हाकालपट्टी केली. तेव्हाच मगोतील फूट दृष्टीपथात आली होती.
या दरम्यान भाजपने कॉंग्रेसचे आणखीन दोन आमदार फुटतात काय याची चाचपणी केली होती. सोमवारी सायंकाळनंतर भाजपचे नेते या मोहिमेवर होते. मात्र फुटीसाठी आवश्यक असलेला दोन तृतीयांश आमदारांचा आकडा जमवणे कॉंग्रेसमधून फुटण्यास इच्छूक आमदारांना शक्य न झाल्याने तो विषय मागे पडला.दीपक पाऊसकर हे आपल्याला ढवळीकर बंधू पक्षातून काढून टाकतील म्हणून घाबरलेले होते. त्यांना मंत्रिपदही हवे होते. याचा फायदा घेत भाजपने चाल रचली आणि पर्यटनमंत्री मनोहर आजगावकर व पाऊसकर यांचा गट एकत्र येईल असे पाहिले. उत्तररात्री पावणेदोन वाजता हे दोघेही विधानसभा संकुलात पोचले तेव्हाच सर्वांना मगोतील फूट अटळ असल्याचे कळून चुकले. उत्तररात्री दोन वाजता आजगावकर व पाऊसकर यांनी वेगळा गट स्थापन करत असल्याचे पत्र प्रभारी सभापती लोबो यांना दिले. त्यांनी १५ मिनिटांनी वेगळ्या गटाला मान्यताही दिली. त्यानंतर तो गट भाजपमध्ये विलीन करण्यात आला.या घडामोडीवेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर हेही उपस्थित होते.

यामुळे विधानसभेतील भाजपची संख्या या दोन मगोच्या दोन आमदारांसह १४ वर पोचली आहे आणि भाजप व कॉग्रेसचे पून्हा विधानसभेतील बलाबल १४-१४ झाले आहे. गोवा फॉरवर्ड या पक्षाचे तीन आमदार विधानसभेत आहेत. भाजप अशाच प्रकारची राजकीय कारवाई त्याही पक्षावर कधी करणार याची आता गोव्यात उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com