काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 22 जून 2018

लोकसभेतील काँग्रेसचे पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहनप्रकाश यांची उचलबांगडी करत काँग्रेसने त्यांच्याजागी खर्गे यांची नियुक्ती केली. 

नवी दिल्ली : काँग्रेसकडून पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकसभेतील काँग्रेसचे पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्र प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी मोहनप्रकाश यांची उचलबांगडी करत काँग्रेसने त्यांच्याजागी खर्गे यांची नियुक्ती केली. 

2019 मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने हे महत्वपूर्ण बदल केल्याचे सांगण्यात येत आहे. मल्लिकार्जुन खर्गे सीमावर्ती भागातील असून, त्यांना महाराष्ट्राची चांगली जाण आहे. तसेच त्यांचे मराठीही चांगले असल्याने पक्षाला याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे प्रभारीपदावर खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी महेंद्र जोशी आणि जे. डी. सिलम यांची पक्षाचे सरचिटणीस तर शशिकांत शर्मा यांची सहसरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे.

दरम्यान, मोहनप्रकाश यांच्यापूर्वी ए. के. अँटोनी यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी म्हणून काम पाहिले होते. त्यावेळी मोहनप्रकाश महाराष्ट्राचे सहप्रभारी होते. त्यानंतर आता मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

Web Title: Mallikarjun Kharge appointed as Maharashtra in charge of Congress