5 स्टार हॉटेलमधून पार्सल मागवून शहा आदिवासी कुटुंबियांसोबत जेवले, ममता बॅनर्जींचा दावा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 24 November 2020

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आतापासूनच कंबर कसून कामाला लागला आहे

कोलकाता : काही दिवसांपूर्वी अमित शहा यांनी पश्चिम बंगाल राज्याचा दौरा केला. अमित शहा यांनी या दौऱ्यात एका आदिवासी घरातील जेवणाचा आस्वाद घेतला होता. यावर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की अमित शहा यांचं हे भोजन म्हणजे 'दिखावा' आहे. तसेच ते जेवण फाईव्ह स्टार हॉटेलमधून आणलेलं होतं. पश्चिम बंगालमधील बांकूरा जिल्ह्यातील खत्रा गावात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. अलिकडेच अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये दोन दिवसीय दौरा केला होता. त्यावेळी अमित शहा यांनी एका आदिवासी कुंटुंबात भोजन केलं  होतं. ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, काही दिवसांपूर्वी आपले माननीय गृहमंत्री इथे आले होते की जो दिखावा होता. त्यांनी जे जेवण केलं होतं ते एका फाईव्ह स्टार हॉटेलमधून त्या आदिवासी कुंटुंबात मागवलेलं होतं. एक ब्राह्मण देखील आणला होता. 

हेही वाचा - भाजप करतंय २०२४ची तयारी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनी तयार केलाय प्लॅन
जमीनीवर बसून जेवण करतानाचा एक फोटोही समोर आला होता. चतुर्दिही गावातील रहिवासी विभीषण हंसदा यांच्या घरी शहा यांनी शाकाहारी जेवण केलं होतं. समोर आलेल्या फोटोंमध्ये डाळ, भात, रोटी आणि इतर जेवण पानावर होतं. अमित शहा यांनी हे जेवण केलं होतं. अमित शहा यांच्यासोबत त्यावेळी पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष देखील होते. दुपारच्या जेवणापूर्वी त्या कुटुंबातील सदस्यांना भाजी चिरताना दाखविण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात जेवण तयार करण्यासाठी कोणत्याही पदार्थांचा वापर केला गेला नव्हता, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री विजयशांती भाजपच्या वाटेवर

या आपल्या भेटीवेळी ममता बॅनर्जी यांनी अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली. यावर भाजपाचे राष्ट्रीय सचिव अनुपम हाजरा यांनी म्हटलंय की, प्रत्येक गोष्टीवर राजकारण करायची तृणमूल काँग्रेसची जुनी खोड आहे. अमित शहा यांनी जे जेवण केलं ते त्याच घरी बनलं होतं, असा निर्वाळा त्यांनी दिला होता. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आतापासूनच कंबर कसून कामाला लागला आहे. येत्या सहा महिन्यांतच निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने बंगालमध्ये चांगली कामगिरी केली होती. या पार्श्वभूमीवर विधानसभेत बहुमत आणून बंगाल ताब्यात घ्यायचा भाजपचा मानस आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mamata Banerjee claimed Amit Shahs lunch at tribal home cooked at 5star hotel