भाजप करतंय २०२४ची तयारी; राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डांनी तयार केलाय प्लॅन

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 24 November 2020

भाजपने दिलेल्या माहितीनुसार, जेपी नड्डा त्यांच्या प्रवासात निवडणुकांच्या तयारी संदर्भात काही आदेश पक्ष कार्यकर्त्यांना देतील. तसंच तज्ज्ञ, विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध योजनांचे लाभार्थी यांच्याशी संवाद साधतील.

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर आता देशात आणखी काही राज्यांमध्ये निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याची तयारी प्रादेशिक पक्षांसह राष्ट्रीय पक्षांनी सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपने मात्र थेट 2024 च्या निवडणुकीची तयारी केली आहे. यासाठी खास अशी रणनिती तयार करण्यात आली असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा स्वत: मैदानात उतरणार आहेत. 

जेपी नड्डा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून देशभरात 120 दिवसांचा प्रवास करणार आहेत. त्यांची ही मोहीम 5 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी सांगितले की, अध्यक्षांच्या या मोहीमेचा उद्देश संघटन मजबूत करणं आणि प्रत्येक बूथ आणि भागात सक्रीयता वाढवणे हा आहे. यामध्ये प्रत्येक बूथचा अध्यक्ष आणि समितीसोबत बैठक घेतली जाणरा आहे. याशिवाय प्रदेशातील पदाधिकारी आणि इतर समित्यांसोबतही चर्चा केली जाणार आहे. 

काय सांगता! बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचं वय पाच वर्षांत वाढलं १२ वर्षांनी​

अरुण सिंह म्हणाले की, जेपी नड्डा देशव्यापी दौऱ्याचा मुख्य उद्देश संघटनात्मक रचना मजबूत करणे आणि संघ भावनेचा विकास करणे, बूथ पातळीवर कामाचा वेग वाढवणं, भाजपची राज्य सरकारांची प्रतिमा सकारात्मक करण्यावर भर देणं, पक्षाचे काम व्यवस्थित करणं इत्यादींचा समावेश आहे. यावेळी सार्वजनिक कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती, 2024 च्या निवडणूक रणनितीवर विचार, संवाद आणि वैचारिक दृष्टीकोनासह आढावा घेतला जाणार आहे. 

Breaking: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई काळाच्या पडद्याआड​

भाजपने दिलेल्या माहितीनुसार, जेपी नड्डा त्यांच्या प्रवासात निवडणुकांच्या तयारी संदर्भात काही आदेश पक्ष कार्यकर्त्यांना देतील. तसंच तज्ज्ञ, विविध क्षेत्रातील कार्यकर्ते, विविध योजनांचे लाभार्थी यांच्याशी संवाद साधतील. भाजपला बूथ पातळीवर ताकद वाढवण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्यादृष्टीने जेपी नड्डा यांचा भर पक्षाच्या कामाला जास्तीजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यावर असेल. 

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारले ४ प्रश्न; कोणते ते वाचा सविस्तर​

वेगवेगळ्या राज्यात त्या त्या प्रदेशानुसार कमी अधिक प्रमाणात जेपी नड्डा मुक्काम करणार आहेत. यामध्ये विधानसभा निवडणुका असलेल्या राज्यात पक्षाची काय तयारी आहे? रणनिती कशी आहे याचाही आढावा घेऊन नड्डा प्रदेश भाजपला मार्गदर्शन करतील. याशिवाय मोठ्या राज्यांमध्ये त्यांचा मुक्काम किमान तीन दिवस आणि लहान राज्यांमध्ये दोन दिवस थांबणार आहेत. यात पुढच्या वर्षी ज्या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत तिथ विशेष लक्ष असणार आहे. 

- देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP president JP Nadda scheduled 120 days nationwide yatra