पंचायत राज निवडणुकीत ममता बॅनर्जी हिंसाचार घडवितात : भाजप

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंचायत राज निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हिंसाचार घडवून आणून राज्यात लोकशाहीची हत्या करीत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पंचायत राज निवडणुकीत तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हिंसाचार घडवून आणून राज्यात लोकशाहीची हत्या करीत आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. या मुद्द्यावर पक्षाचे एक शिष्टमंडळ उपराष्ट्रपतींना आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटले असून, त्यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे. 

तृणमूल कॉंग्रेसच्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या कार्यकर्त्याच्या नातेवाइकांना आणि जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना भाजपने प्रसारमाध्यमांसमोर आणले. त्याचबरोबर पश्‍चिम बंगालमध्ये पंचायत राज निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रिमो, मुकुल रॉय आणि राहुल सिन्हा यांनी ममता बॅनर्जी सरकारवर सडकून टीका केली. 

राज्य सरकार बरखास्त करण्यासाठी योग्य असे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. पंचायत राज निवडणुकीत भाजप तृणमूल कॉंग्रेसला हारवेल, असा विश्‍वास सुप्रिमो यांनी व्यक्त केला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांना "हुतात्मा' बनविण्याची गरज नसून, त्यांना निवडणुकीत पराजित करणार आहोत, असे राहुल सिन्हा म्हणाले.  

 
 

Web Title: Mamta banarjee Create violence says BJP