'Don't Worry! कुजलेले घटक बाहेर पडताहेत'; बंडखोरीवर ममतांचा पक्षाला दिलासा देण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 December 2020

पक्षातील चार आमदारांनी राजीनामा दिल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गेल्या दोन दिवसांत मोठे झटके बसले आहेत.

कोलकाता : पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत कारण राजकारण खूपच तापलेले आहे. या निवडणुकीत ममतांना पायउतार करण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. आणि त्यासाठी भाजप आतापासूनच कंबर कसून कामाला लागली आहे. गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगालचे दौरे वारंवार करत असून आजही ते दौऱ्यावर आहेत. 

पक्षातील चार आमदारांनी राजीनामा दिल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना गेल्या दोन दिवसांत मोठे झटके बसले आहेत. 'तृणमूल’चे आमदार शीलभद्र दत्त आणि अल्पसंख्याक गटाचे नेता कबीर उल इस्लाम यांनी शुक्रवारी पक्षाचा राजीनामा दिला. या आधी सुवेंदू अधिकारी आणि जितेंद्र तिवारी हेही ‘टीएमसी’तून बाहेर पडले आहेत. ममतांना एकावर एक बसत असणाऱ्या या झटक्यांचे येत्या निवडणुकीत प्रतिकूल परिणाम होतील, असं बोललं जात आहे. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे. 

हेही वाचा - 'पुत्रप्रेमातून बाहेर पडून पक्षाला वाचवा'; सोनिया गांधींना सल्ला

त्यांनी काल शुक्रवारी रात्री बंडखोर नेत्यांवर निशाणा साधत म्हटलं की, हे बरं झालं की पक्षातून कुजलेले घटक आपोआपच बाहेर पडत आहेत. त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांना 'पक्षावरचं ओझं' असं संबोधलं आहे. बॅनर्जी यांनी सध्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपल्या घरी निवडक नेत्यांसमवेत एक अंतर्गत बैठक घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, बॅनर्जी यांनी तृणमूल नेत्यांना म्हटलंय की, या घटनांमुळे काळजी करु नका, कारण राज्यातील लोक त्यांच्या सोबतच आहेत. तृणमूल काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं की, बैठकीच्या दरम्यान आमच्या पक्षाच्या सुप्रीम लीडर ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, तुम्ही नेत्यांच्या बंडखोरीमुळे चिंताग्रस्त होऊ नका. कारण हे बरंच झालंय की पक्षातून कुजलेले घटक बाहेर पडताहेत. ही बैठक संध्याकाळी सात वाजता सुरु झाली आणि रात्री 9:30 वाजेपर्यंत सुरु राहिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mamta banerjee retaliates against rebel leaders well done the rotten people left the party