मोदी, शहांच्या हत्येची धमकी; आरोपीस अटक

वृ्त्तसेवा
Wednesday, 8 January 2020

  • आरोपी दक्षिण कन्नडचा रहिवासी

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हत्येची धमकी देण्याच्या आरोपाखाली कर्नाटकातील एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी मंगळवारी दिली. तो व्हॉट्‌सअप ग्रुपमध्ये व्हायरल झालेल्या ध्वनिफितीमधील संदेश पसरवत होता आणि लोकांना जातीय हिंसाचारासाठी उद्युक्त करत होता, असा त्याच्यावर आरोप आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पेरुवाई येथील रहिवासी अन्वर असे आरोपीचे नाव आहे. माध्यमाशी बोलताना जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या अटकेची पुष्टी केली. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि प्रस्तावित नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी)च्या अंमलबजावणीविरुद्ध ऑनलाइन संदेश पाठवत असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या संदर्भात विटाल पोलिस स्थानकात यतीश नावाच्या व्यक्तीने तक्रार दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तक्रारीनुसार, अन्वर याने आपल्या संदेशात सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना त्रास झाला तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.

आणखी वाचा : नवीन पालकमंत्र्यांची यादी जाहीर; पाहा कोणत्या जिल्ह्याला कोण आहे पालकमंत्री

पोलिस सूत्रांनी सांगितले, की आरोपी कतारमध्ये कॅब ड्रायव्हर म्हणून काम करत होता. ही ध्वनिफीत कतारमध्ये रेकॉर्ड करण्यात आली होती आणि काही दिवसांपूर्वी तो भारतात परत आल्यावर त्याने ती व्हायरल करण्यास सुरुवात केली होती. ध्वनिफीत व्हायरल झाल्यानंतर तक्रार दाखल केली आणि त्याला अटक करण्यात आली. 6 जानेवारीला अन्वरच्या गावी जाऊन पोलिसांनी त्याला अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man Arrested For Issuing Death Threats To PM Modi, Amit Shah