CAA:शाहीनबाग आंदोलनात तरुणाकडून गोळीबार; तात्काळ अटक

टीम ई-सकाळ
Saturday, 1 February 2020

शाहीनबाग येथील आंदोलन स्थळी पुन्हा गोळीबार झाला. एका तरुणाने दोन गोळ्या झाडून खळबळ उडबवून दिली.  संबंधित तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याचे नाव कपिल गुज्जर असल्याची माहिती आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील शाहीनबाग येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या सीएए विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात आज, गोळीबार झाला. सीएए कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनस्थळी गोळीबाराची गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी घटना आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे. गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशमधील नोएडा सीमेजवळचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आज, शाहीनबाग येथील आंदोलन स्थळी पुन्हा गोळीबार झाला. एका तरुणाने दोन गोळ्या झाडून खळबळ उडबवून दिली.  संबंधित तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याचे नाव कपिल गुज्जर असल्याची माहिती आहे. तो नोएड सीमेवरील दल्लूपुरा गावचा रहिवासी असल्याची माहिती आहे. त्याने आंदोलन स्थळी दोन गोळ्या झाडल्या. यात कोणीही जखमी झाले नाही, गोळ्या झाडताना त्यानं 'हमारे देश मै सिर्फ हिंदुओंकी चलेगी, बाकी किसी की नही,' जय श्रीराम, अशा घोषणा दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार तेथे नेमण्यात आलेल्या पोलिसांच्या बाजूला उभा राहूनच त्यानं गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. गोळ्या झाडतानाच त्याची बंदू निकामी झाली. त्यामुळं तो धावून लागला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 

आणखी वाचा - दोन तास 39 मिनिटांनंतरही अर्थमंत्र्यांचे भाषण अर्थवटच

गोळीबाराची ही दुसरी घटना
जामीयाँ मिलियाँ इस्लामिया विद्यापीठाजवळ सुरू असलेल्या सीएए विरोधातील आंदोलन स्थळी गुरुवारी दुपारी गोळीबार झाला होता. त्यात एक तरुण जखमी झाला. तर गोळीबार करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. गोळीबार करणार मुलगा हा 17 वर्षांचा असून, गावठी पिस्तुलातून त्यानं गोळ्या झाडल्या होत्या. संबंधित मुलगा हा 12वीत शिकत असून, त्याला शाहीनबाग आंदोलनात गोळीबार करायचा होता. पण, रिक्षा चालकानं त्याला वाहतूक कोंडीमुळं वाटेतच सोडल्यामुळं त्यानं विद्यापीठाजवळ गोळीबार केल्याची माहिती दिली होती. 

आणखी वाचा - रोहित पवार, अर्थसंकल्पाबाबत काय म्हणाले?

काय आहे शाहीनबाग आंदोलन?
दिल्ली आणि नोएडा यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर शाहीनबाग येथे गेल्या जवळपास महिनाभरापासून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. पण, आंदोलक जागेवरून हटण्यास तयार नाहीत. दिवसेंदिवस या आंदोलनाची तीव्रता वाढत असून, देशभरात या आंदोलनाची चर्चा सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: man fired two rounds bullets at shaheen bagh protest new delhi